पाच तासात दिल्या ५०० शिधापत्रिका
By Admin | Updated: July 15, 2014 00:46 IST2014-07-14T22:54:46+5:302014-07-15T00:46:40+5:30
केडगाव : शिधापत्रिकेच्या ज्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महिनोन्महिने चकरा माराव्या लागतात,
पाच तासात दिल्या ५०० शिधापत्रिका
केडगाव : शिधापत्रिकेच्या ज्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महिनोन्महिने चकरा माराव्या लागतात, असा अनुभव सामान्यांना नेहमीच येतो़ मात्र, महसूल विभागाने केडगाव, भिंगार, सावेडी उपनगरात उपक्रम राबवून अवघ्या पाच तासात शिधापत्रिकांची सुमारे ५०० प्रकरणे निकाली काढली.
शिधापत्रिकेतील नावांची दुरुस्ती, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव नव्याने दाखल करणे, कुटुंबाचे विभाजन झाले असल्यास शिधापत्रिकांचे विभाजन करुन नव्याने शिधापत्रिका देणे या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात सामान्यांना चकरा माराव्या लागतात. सतत हेलपाटे मारुनही कामे होत नाही, अशी सर्वसामान्यांची नेहमीच तक्रार असते.
महिनाभर त्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येते मात्र याच विभागातील अधिकाऱ्यांनी १५ जणांचे पथक तयार केले. केडगाव, सावेडी व भिंगार या ठिकाणी या पथकाने सुटीच्या दिवशी जाऊन शिधापत्रिकांसंदर्भातील कोणत्याही प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी उपक्रम सुरु केला. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने अवघ्या पाच तासातच या भागातील जवळपास ५०० प्रकरणे जागच्या जागी पूर्ण केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
या पथकामध्ये राजेंद्र शिंदे, बी. आर. वामन, राजेंद्र लाड, दिलीप कळमकर, संदिप काळे या अधिकाऱ्यांचा समावेश होता. नायब तहसीलदार भारती सागरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने हा उपक्रम राबवला. विशेष म्हणजे या पथकाने सुटीच्या दिवशीच ही कामे पूर्ण केली.
(प्रतिनिधी)