५० टक्केची दडपशाही

By Admin | Updated: July 10, 2014 00:31 IST2014-07-09T23:26:16+5:302014-07-10T00:31:18+5:30

श्रीरामपूर : राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील खंडकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करताना श्रीरामपूर शहरालगत जमिनी असणारांना शहराजवळ फक्त ५० टक्के जमिनी घेण्यासाठी महसूल यंत्रणेच्या

50 percent repression | ५० टक्केची दडपशाही

५० टक्केची दडपशाही

श्रीरामपूर : राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील खंडकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करताना श्रीरामपूर शहरालगत जमिनी असणारांना शहराजवळ फक्त ५० टक्के जमिनी घेण्यासाठी महसूल यंत्रणेच्या माध्यमातून राजकीय पुढाऱ्यांनी दडपशाही सुरू केली आहे.
आमच्या आहे त्याच ठिकाणच्या जमिनी त्याचठिकाणी १०० टक्के मिळाव्यात, अशी खंडकऱ्यांची मागणी आहे. खंडकरी जमीन वाटपाच्या शासन आदेशात मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी प्राधान्याने त्यांनाच वाटप करावे, असे म्हटले आहे. तर प्रत्यक्षात श्रीरामपूर लगतच्या पैसे पिकविणाऱ्या महागड्या जमिनींवर पुढाऱ्यांचा डोळा आहे. त्यातूनच शहरालगत शेतजमिनी असणाऱ्या खंडकऱ्यांना ५० टक्के जमीन शहरालगत तर ५० टक्के इतरत्र देण्याचा नियमबाह्य निर्णय एका बैठकीत घेण्यात आला. खंडकऱ्यांना त्यांच्या जमिनी प्राधान्याने देण्याच्या शासन आदेशाला हा निर्णय छेद देणारा आहे. जमीन वाटपाचे कामकाज पाहणारे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या श्रीरामपूरमधील पहिल्याच बैठकीत खंडकऱ्यांनी ५० टक्के वाटपास विरोधही केला. तर शहरालगतच्या जमिनींच्या बाजारभावाने येणाऱ्या कोट्यवधी रूपयांच्या किमतीचा हिशोब करणाऱ्या काहीजणांनी उतावळेपणाने संमतीही दाखविली. पण मूळ खंडकऱ्यांची जमीन त्यांनाच प्राधान्याने देण्यात यावी, असे शासन निर्णयात म्हटले असतानाही राजकीय हस्तक्षेपातून फिफ्टी फिफ्टीचा तोडगा काढून ५० टक्के क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी खंडकऱ्यांवर दबाव आणला जात आहे.
त्यानुसार श्रीरामपूर व दत्तनगर येथील खंडकऱ्यांना ४ जुलैच्या पत्राने ७ दिवसात ५० क्षेत्राबरोबर उर्वरित ५० टक्के क्षेत्र मागणीबाबत अर्ज सादर न केल्यास आपणास उर्वरित ५० टक्के क्षेत्र वाटपासाठी शिल्लक असलेल्या उक्कलगाव, निपाणी वडगाव, शिरसगाव येथील क्षेत्र नेमून देऊन जमीन वाटप प्रक्रिया एकतर्फी पूर्ण करण्यात येईल, असा दमच तहसीलदारांच्या नावाने दिलेल्या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.
शेती महामंडळाच्या टिळकनगर मळ्यातील मौजे श्रीरामपूर व दत्तनगर येथील माजी खंडकरी अथवा कायदेशीर वारस यांना जमीन वाटप करण्याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी १ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेतली. त्यात या खंडकऱ्यांना ५० टक्के क्षेत्र सोडून बाकी गावात शिल्लक राहिलेले क्षेत्र पाहणी करून अर्ज भरण्याचा निर्णय झाल्याचे नोटिसीत म्हटले आहे.
(प्रतिनिधी)
आमच्या वाडवडिलांची जमीन शेती महामंडळाकडे खंडाने दिलेली होती. आता महामंडळाच्या ताब्यातील आमच्या जमीन परत देताना आमच्या जमिनी आम्हाला १०० टक्के परत करा. आमच्या चांगल्या दर्जाच्या, चांगल्या किंमतीच्या जमिनी ठेवून आम्हाला दुसरीकडे निकृष्ट दर्जाच्या जमिनी नको आहेत.
- संतोष भीमराज मोरगे,
खंडकरी वारस, श्रीरामपूर.

Web Title: 50 percent repression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.