५० टक्के बसेस आगारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:08+5:302021-06-26T04:16:08+5:30
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस ७ जूनपासून पुन्हा धावू लागली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक ...

५० टक्के बसेस आगारातच
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस ७ जूनपासून पुन्हा धावू लागली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे, परंतु अद्यापही हवा तसा प्रतिसाद बसला मिळत नसल्याची माहिती आहे. नगर जिल्ह्यात ११ आगार असून, त्यांच्या सुमारे ७०० बस आहेत. प्रत्येक आगारातून दररोज २५ ते ३० बस सोडल्या जातात. अशा एकूण ३३७ बस सध्या सुरू आहेत. यात लांब पल्ल्याच्या पुणे, मुंबई, नाशिक अशी वाहतूक सुरू आहे. मात्र, क्षमतेच्या ४० टक्केच प्रतिसाद सध्या मिळत आहे. उर्वरित बसही महामंडळ सुरू करू शकते. मात्र, ग्रामीण भागातून मागणी नाही. अद्याप शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ते सुरू झाल्यानंतर काही बस सुरू होऊ शकतात.
---------
१) जिल्ह्यातील एकूण बसेस - ७००
सध्या सुरू असलेल्या बसेस - ३६३
आगारातच उभ्या बसेस - ३३७
२) एकूण कर्मचारी - ४,०००
चालक -१,२६७
वाहक -१,३०८
सध्या कामावर चालक -१,२६७
सध्या कामावर वाहक -१,३०८
---------------
या गावांना बस कधी सुरू होणार?
नगर तालुक्यातील वाळकी, रुईछत्तीशी, मांडवा, आगडगाव, रतडगाव, गुंडेगाव, सारोळा कासार, वांबोरी (ता.राहुरी), कान्हूर पठार, निघोज (ता.पारनेर), सोनई (ता. नेवासा), मांडवगण (ता.श्रीगोंदा) अशा मोठ्या गावांना अजूनही बस सुरू नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना खासगी किंवा स्वत:च्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
--------------
गेल्या वर्षभरातून एसटी बस बंद असल्याने शहरात येण्यासाठी प्रवासाची सोय नाही. शेतीच्या कामासाठी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी या मार्गावर बस सुरू करावी.
- संदीप हराळ, राळेगण म्हसोबा, ता. नगर
------------
गेल्या वर्षभरापासून बस बंद असल्याने, बँकेत किंवा दवाखान्यात नगरला जाण्यासाठी वृद्धांची गैरसोय होते. खासगी वाहतूकही सध्या बंद आहे. त्यामुळे बस सुरू झाली, तर मोठा आधार होईल.
- विकास वाळके, लोणी सय्यदमीर