जेऊर आरोग्य केंद्रांतर्गत ५ गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:09+5:302021-06-03T04:16:09+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोळा गावांपैकी ५ गावे कोरोनामुक्त झाली असून ८ गावांची कोरोनामुक्तीकडे ...

जेऊर आरोग्य केंद्रांतर्गत ५ गावे कोरोनामुक्त
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोळा गावांपैकी ५ गावे कोरोनामुक्त झाली असून ८ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ससेवाडी, पांगरमल खोसपुरी, उदरमल, आव्हाडवाडी ही गावे कोरोनामुक्त झाली असून, येथे सद्यस्थितीत एकही सक्रिय रुग्ण नाही. तर इमामपूर, धनगरवाडी, पोखर्डी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, मांजरसुंभा, पिंपळगाव उज्जैनी, मजले चिंचोली या गावातील कोरोना रुग्णांची संख्या १० च्या आत आली आहे. इमामपूर व पोखर्डी गावात तर सक्रिय रुग्णांची संख्या १ आहे. या आठ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जेऊर, शेंडी व बहिरवाडी येथील रुग्णांची संख्या १०च्या वर असली तरी कोरोना नियंत्रणात आलेला आहे.
जेऊर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोळा गावांमध्ये मार्च महिन्यापासून आजपर्यंत २ हजार ३४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६६ रुग्ण सक्रिय असून उपचार घेत आहेत. आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक मृत्यू पिंपळगाव माळवी (३०) येथे झाले आहेत, तर पांगरमल व आव्हाडवाडी येथे कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. सर्वाधिक रुग्ण हे जेऊर (६८७), तर सर्वात कमी रुग्ण मांजरसुंभा (२८) येथे आढळून आले आहेत. सोळा गावातील मृत्युदर हा जास्त असून ५.१९ टक्के आहे, तर रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के एवढे आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे प्रमाण २.८१ टक्के आहे.
----
चार हजार नागरिकांचे लसीकरण
जेऊर आरोग्य केंद्रांतर्गत डॉ. योगेश कर्डिले व डॉ. सुप्रिया थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ४ हजार १७८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर ४ हजार ६२४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
---
गावात महिनाभर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात जनजागृती, आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करण्यात आले. गावात जंतनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. नागरिकांनी कोरोनाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे गावातील कोरोना नियंत्रणात होता. आज संपूर्ण गाव कोरोनामुक्त झाले आहे.
- बापूसाहेब आव्हाड, सरपंच, पांगरमल
---
तालुक्यात कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेतल्यास तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल.
- डॉ. योगेश कर्डिले, वैद्यकीय अधिकारी