कृषिपंपांच्या ५ हजार ८५६ वीजजोडण्यांची कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:42+5:302021-07-09T04:14:42+5:30
अहमदनगर : राज्यातील अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळाचे तडाखे, सलग दीड-दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव, नवीन तंत्रज्ञानाच्या रोहित्रांचे मर्यादित उत्पादन यासह ...

कृषिपंपांच्या ५ हजार ८५६ वीजजोडण्यांची कामे पूर्ण
अहमदनगर : राज्यातील अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळाचे तडाखे, सलग दीड-दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव, नवीन तंत्रज्ञानाच्या रोहित्रांचे मर्यादित उत्पादन यासह अनेक अडथळ्यांवर मात करीत महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांच्या नगर जिल्ह्यातील ५ हजार ८५६ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. यासाठी जिल्ह्यात ५ हजार ८२० विद्युत रोहित्र उभारण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याकरिता ७ हजार ३३२ जोडण्या देण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी ५ हजार ८५६ म्हणजे ८० टक्के जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ४० हजार २५२ वीजजोडण्यांची काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. राज्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या २ लाख २४ हजार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडणीसाठी राज्य शासनाने उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरु केली. त्याप्रमाणे स्वतंत्र रोहित्राद्वारे प्रत्येकी एक किंवा जास्तीत जास्त दोन कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात येत आहेत. या योजनेसाठी राज्य शासनाने ५ हजार ४८ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही कामेही वेगाने सुरू झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील या कामांना अतिवृष्टी, पूर परिस्थिती आदींची फटका बसत गेला. तसेच या योजनेतील नव्या तंत्रज्ञानाचे १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांची मागणी वाढली. त्यानंतर मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे रोहित्रांच्या उत्पादनावर मर्यादा आल्या. दरम्यान राज्यात महापुराचे व चक्रीवादळाचे मोठे तडाखे बसले. यात देखील प्रामुख्याने ग्रामीण भागातील वीज यंत्रणेला तडाखे बसले. यावर मात करीत महावितरणने आतापर्यंत नगर जिल्ह्यातील ५ हजार ८५६ वीजजोडण्या पूर्ण केल्या आहेत.