नगर शहराला ५९९ कोटी
By Admin | Updated: July 7, 2014 00:34 IST2014-07-06T23:34:47+5:302014-07-07T00:34:50+5:30
अहमदनगर: स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकास किरकोळ दुरुस्तीसह सर्वसाधारण सभेने रविवारी मंजुरी दिली़

नगर शहराला ५९९ कोटी
अहमदनगर: स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकास किरकोळ दुरुस्तीसह सर्वसाधारण सभेने रविवारी मंजुरी दिली़ सभेत नेहरू मार्केट, घनकचरा व्यवस्थापन, सावेडी स्मशानभूमी, यासारख्या सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या असून, काही नवीन प्रकल्प हाती घेण्याचेही ठरले़ अनाधिकृत मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करण्याचाही ठराव करण्यात आला आहे़
स्थायी समितीने शनिवारी सर्वसाधारण सभेत यंदाचे अंदाजपत्रक सादर केले़ अभ्यासासाठी तहकूब केलेली ही सभा रविवारी महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ उपमहापौर सुवर्णा कोतकर, प्रभारी आयुक्त भालचंद्र बेहरे यावेळी उपस्थित होते़
स्थायी समितीचे ५९९ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते़ सभेच्या सुरुवातीला अभ्यासासाठी वेळ देण्याची मागणी करत युतीच्या सदस्यांनी सभात्याग केला़ विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर जमा व खर्चावर चर्चा झाली़ सदस्यांच्या सूचनांचा अंदाजपत्रकात समावेश करण्याच्या सूचना देत चर्चेअंती महापौर जगताप यांनी अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचे जाहीर केले़ तत्पूर्वी गणेश भोसले यांनी आयुक्त व उपायुक्त गैरहजर असल्याकडे लक्ष वेधत प्रमुख अधिकारी गैरहजर आहेत, याबाबत त्यांच्याकडे लेखी विचारणा करा, अशी मागणी त्यांनी केली़ बाळासाहेब बोराटे यांनी शहरात किती मोबाईल मनोरे आहेत, त्यापैकी किती अधिकृत आहे़ त्यांना कर कसा आकारला जातो, हा प्रश्न उपस्थित करीत सर्वेक्षणाची मागणी केली़ एका महिन्यांत जाहिरात फलक व टॉवरचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या़
मोबाईल टॉवर असलेल्या इमारतधारकांना व्यावसायिक कराच्या आकारणीची मागणी सदस्यांकडून झाली़ याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना महापौरांकडून देण्यात आल्या आहेत़ अजिंक्य बोरकर यांनी हाच धागा पकडून वाहनतळांची निर्मिती करून उत्पन्न वाढविण्याची शिफारस स्थायी समितीने केली असल्याचे सांगितले़ याच विषयावर सभापती डागवाले यांनी कोहिनूर मागील वाहनतळाचा मुद्दा उपस्थित केला़ ही जागा ताब्यात घेऊन महापालिकेने वाहनतळ सुरू करण्याची मागणी त्यांनी केली़ याविषयी कायदेशीर माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या़ अग्निशमन बंब खरेदीसाठी तरतूद केली़ मात्र केडगावचे केंद्र सुरू करा, अशी मागणी सुनील कोतकर यांनी केली़ हे केंद्र सुरू करण्याबरोबरच अग्निशमनबंबासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ (प्रतिनिधी)
नगरसेवकांनी कॅफोंनाच केले लक्ष्य
स्थायी समितीच्या सभेत अंदाजपत्रकातील तरतुदींबाबत सदस्यांनी लेखा वित्त अधिकारी प्रदीप शेलार यांना लक्ष्य केले होते़ त्यामुळे शेलार यांनी आजारी असल्याचे कारण देऊन रजा घेतली होती़ त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत स्थायीत चर्चा झाली़
परंतु रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला शेलार उपस्थित होते़ सदस्यांनी शेलार यांच्यावर अकार्यक्षम अधिकारी असा ठपका ठेवत टीका केली़ दुर्धर आजार सहाय्यता निधी व शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकावरून शेलार यांचेशी चांगलाच वाद झाला़
जगतापांची तंबी
सभेच्या सुरुवातीला एकाचवेळी अनेक सदस्यांनी ध्वनीक्षेपकाचा ताबा घेत तावातावाने बोलण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला़ कुणीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हते़ त्यामुळे महापौर जगताप यांनी अजिबात गोंधळ करायचा नाही़ गोंधळ खपवून घेणार नाही, अशी तंबी भरली़
महापालिका आहे की खेऴ़़़
सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता आली नाहीत़ शहरातील टॉवरची माहिती उपलब्ध नव्हती़ अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवित होते़ अधिकाऱ्यांना माहिती देता न आल्याने एकच गोंधळ उडाला़ अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याने दीप चव्हाण यांनी ही महापालिका आहे की काही खेळ, असे विधान केल्यानंतर सभागृहात शांतता पसरली़