प्रत्येक शाळेत ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:51+5:302021-07-02T04:14:51+5:30
केडगाव : कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने झालेले नुकसान, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा आदींनी विद्यार्थ्यांचा मोठा लर्निंग लॉस झाला आहे. ...

प्रत्येक शाळेत ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स सुरू
केडगाव : कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने झालेले नुकसान, ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा आदींनी विद्यार्थ्यांचा मोठा लर्निंग लॉस झाला आहे. आता नवीन वर्गात जाण्यापूर्वी हा लर्निंग लॉस ब्रिज कोर्स (सेतू अभ्यासक्रम) च्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न होणार आहे. हा ब्रिज कोर्स गुरुवारपासून शाळांमध्ये सुरू झाला आहे.
कोरोना कालावधीमुळे गेली दीड वर्ष शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. मर्यादा असल्याने ऑनलाइन माध्यमातून अपेक्षित शिक्षण मुलांपर्यंत पोहोचलेले नाही. विद्यार्थ्यांना अपेक्षित आकलन झालेले नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे तर ऑनलाइन शिक्षणाची सोयही नव्हती. ग्रामीण, दुर्गम आणि अति दुर्गम भागातील विद्यार्थी तर शिक्षण प्रवाहापासून दूर गेल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी पुढील इयत्तेत दाखल होत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यासक्रम सुरू करू नये, अशी अनेक शिक्षकांची मागणी आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी या ब्रिज कोर्सची निर्मिती केली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हा ब्रिज कोर्स इयत्ता २ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणार आहे. खासगी, सरकारी,अनुदानित, विनाअनुदानित या सर्व शाळांसाठी हा कोर्स बंधनकारक असणार आहे.
४५ दिवस चालणाऱ्या या ब्रिज कोर्समध्ये भाषा, गणित, सामाजिक शास्त्रे अशा विषयांचा समावेश आहे.
---
ब्रिज कोर्स कसा असेल
समजा यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का? हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
---
शिक्षकांकडून अपेक्षा
शिक्षकांनी हा ब्रिज कोर्स पूर्ण करताना केवळ एक कोर्स पूर्ण करायचा या दृष्टिकोनातून पाहू नये. विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रात्यक्षिक, त्यांचे अनुभव, आकलन, संकल्पना स्पष्टीकरण याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे. १ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत हा अभ्यासक्रम असणार आहे. त्यात तीन चाचणी परीक्षा होणार आहेत.
----
शाळा नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या असत्या तर नवीन इयत्तेचा अभ्यासक्रम शिकवण्याअगोदर ब्रिज कोर्स माध्यमातून लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी आम्ही तयारी केली होती. पण यावर्षीही ऑनलाईन पद्धतीनेच शाळा सुरू होत आहेत. ब्रिज कोर्स पूर्ण झाल्यानंतर मूळ अभ्यासक्रम राबवायचा आहे.
-दिनकर टेमकर,
उपसंचालक, राज्य शिक्षण संशोधन प्रशिक्षण परिषद, पुणे