कोपरगाव : संपूर्ण भारतात रविवारी (दि.३१) जन्मलेल्या बाळापासून पाच वर्षापर्यंतच्या बालकाला पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर कोपरगाव तालुक्यातही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ३२ हजार १७ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. यासाठी २८१ पोलिओ बुथवर ५७९ कर्मचाऱ्यांमार्फत हे डोस देण्यात येणार आहेत. यामध्ये आशा, अंगणवाडी सेविका, ए. एन. एम .एम. पी. डब्ल्यू, आरोग्य सहायक, आरोग्य सहाय्यिका, वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली आहे.
डॉ. विधाते म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी येथे पोलिओ बुथवर सकाळी ८ ते ५ या वेळेत डोस देण्यात येणार आहे. पालकांनी काळजीपूर्वक आपल्या बालकाला लसीकरण करून घ्यावे, तसेच आलेल्या पाहुण्यांची, नव्याने जन्म झालेल्या ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना नजिकच्या पोलिओ बुथवर पोलिओ डोस देण्यासाठी आणावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.