पहिल्या दिवशी ३० टक्के विद्यार्थी शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:11+5:302021-02-05T06:31:11+5:30
अहमदनगर : पाचवी ते आठवी शाळांची घंटा बुधवारपासून वाजली असून पहिल्याच दिवशी ३ लाख ८२५पैकी ८८ हजार ४५६ (३० ...

पहिल्या दिवशी ३० टक्के विद्यार्थी शाळेत
अहमदनगर : पाचवी ते आठवी शाळांची घंटा बुधवारपासून वाजली असून पहिल्याच दिवशी ३ लाख ८२५पैकी ८८ हजार ४५६ (३० टक्के) विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. २०२७ पैकी १७५९ शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या.
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन महिन्यांपूर्वी सुरू झाल्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आवश्यक त्या सूचना शाळांना दिल्या होत्या. नगर जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत एकूण २०२७ शाळा असून त्यामुळे ३ लाख ८२५ विद्यार्थी आहेत.
या शाळांवर एकूण शिक्षकांची संख्या सव्वासात हजार आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. पैकी पहिल्या दिवशी साडेपाच हजार शिक्षक शाळेवर हजर होते. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही याबाबत पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येत होते. पहिल्या दिवशी ९२ हजार पालकांनी संमतीपत्र भरून दिले.
कोरोनाची सर्व खबरदारी घेत सोशल डिस्टन्स ठेऊन मुले वर्गात हजर झाली. पहिल्या दिवशी सकाळी १० ते २ या वेळेत विद्यार्थी शाळेत हजर होती. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढल्यानंतर शाळा दिवसाआड सुरू करायची किंवा कशी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पहिल्या दिवशी २०२७पैकी १७५९ शाळा सुरू होऊन ८८ हजार ४५६ विद्यार्थी शाळेत आले. हळूहळू ही संख्या वाढणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ५ टक्के होती. त्या तुलनेत पाचवी ते आठवीची उपस्थिती समाधानकारक मानली जात आहे.
---------------
फोटो - २७शाळा