बाधितांच्या संपर्कातील ३० जणांची चाचणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:22+5:302021-09-23T04:24:22+5:30
अहमदनगर : एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजन करण्याचा आदेश ...

बाधितांच्या संपर्कातील ३० जणांची चाचणी करणार
अहमदनगर : एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजन करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रोज १५ ते १६ हजार चाचण्या व्हायच्या, ही संख्या आता ३० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी माध्यमांना सांगितले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या कमी होत नाही. त्यामुळे राज्यात कोरोनाची महामारी पुन्हा सुरू झाली तर ती अहमदनगर जिल्ह्यातून सुरू होईल, असा इशारा विभागीय आयुक्त गमे यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात दिला होता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गमे यांनी यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. गमे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या वाढविण्याचा आदेश दिला आहे. एका बाधिताच्या संपर्कातील ३० जणांची चाचणी करणे, रोज जिल्ह्यात ३० हजार चाचण्या अपेक्षित आहेत, असे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
--------------
मास्क नसेल तर दंड
सध्या मास्क वापरण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. याकडे विभागीय आयुक्तांनीही लक्ष वेधले होते. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पायाभूत तीन नियमांचे नागरिकांनी पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरत नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तशी कारवाई पोलिसांमार्फत सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
---
जिल्ह्यात बुधवारी ८४८ रुग्ण
बुधवारी जिल्ह्यात ८४८ इतके रुग्ण आढळून आले. त्यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १७५, पारनेर तालुक्यात ९० रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय नगर शहर (१९), राहाता (६२), श्रीरामपूर (२२), नेवासे (३८), पाथर्डी (६२), अकोले (८६), कोपरगाव (३०), कर्जत (२७), राहुरी (२४), भिंगार (३), शेवगाव (६६), जामखेड (१८), श्रीगोंदा (७७) येथेही बाधित रुग्ण आढळून आले.