३ हजार विद्यार्थ्यांची टीईटीला दांडी
By Admin | Updated: June 7, 2016 23:33 IST2016-06-07T23:25:38+5:302016-06-07T23:33:12+5:30
अहमदनगर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)ची पुनर्परीक्षा मंगळवारी पार पडली. या परीक्षेसाठी १० हजार ८६८ उमेदवारांनी नोंदणी केली होती.

३ हजार विद्यार्थ्यांची टीईटीला दांडी
अहमदनगर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)ची पुनर्परीक्षा मंगळवारी पार पडली. या परीक्षेसाठी १० हजार ८६८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ७ हजार ८०३ उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेला हजर होते. ३ हजार ६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. औरंगाबाद जिल्ह्यातील एका उमेदवाराला नगरच्या केंद्रावर परवानगी मिळाल्याने त्याने या ठिकाणी परीक्षा दिली.
जानेवारी महिन्यात पेपर फुटीमुळे टीईटीचा पहिला पेपर रद्द करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने १८ मे ला ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या दिवशी विद्यापीठाच्या काही विषयांची परीक्षा होणार होती. ही बाब ‘लोकमत’ ने परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे १८ तारखेला होणाऱ्या टीईटी परीक्षेची तारीख रद्द करण्यात येऊन ७ जूनला परीक्षा घेण्यात आली. मंगळवारी नगर शहरातील ३५ केंद्रावर टीईटीसाठी परीक्षा झाली. यात इंग्रजी व उर्दू माध्यमातील प्रत्येकी एका केंद्राचा समावेश होता.
७ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यात मराठी माध्यमातील ७ हजार ५६३, उर्दू माध्यमातील १९१ आणि इंग्रजी माध्यमातील १४० परीक्षार्थी होते. परीक्षेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यावर होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने औरंगाबाद जिल्ह्यातील एका उमेदवाराला नगरच्या केंद्रावर परीक्षा देण्यास परवानगी दिल्याने या उमेदवाराने नगरला परीक्षा दिली.
(प्रतिनिधी)