जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST2021-05-15T04:19:24+5:302021-05-15T04:19:24+5:30
राज्यासह नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला लसीकरणाला प्रतिसाद नव्हता. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि इतर ...

जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा
राज्यासह नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला लसीकरणाला प्रतिसाद नव्हता. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रन्टलाइन वर्कर यांचे लसीकरण सुरू होते. मात्र, मार्च महिन्यापासून संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर नागरिकांची अचानक लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. लसीकरण केंद्रांवर मोठमोठ्या रांगा लागत असल्याने लसीकरणाचे नियोजन कोलमडू लागले. त्यामुळे शासनाने १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण थांबविले आहे. सध्या आवश्यक प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे. दुसरा डोसही अनेक जणांना वेळेत मिळालेला नाही. साधारण पहिल्या डोसनंतर २८ ते ६० दिवसांच्यामध्ये दुसरा डोस देणे अपेक्षित असताना अनेकांचा साठ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही डोस मिळालेला नाही. नगर जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ५३ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर केवळ १ लाख १५ हजार १७४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे अजूनही ३ लाख ३८ हजार नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
-------------
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्यसेवक - २६०४६. १७०२८
फ्रंटलाईन वर्कर्स - १००५०. ५९००
४५ पुढील वयोगटाचे - ४१६८३१. ९२२७०
एकूण ४५२८९२. ११५१७४
--------------
एकही डोस न घेणारे २० हजार
जिल्ह्यात २० हजार कोरोना योद्ध्यांनी अद्याप एकही डोस घेतला नाही. आरोग्य, महसूल, पोलीस, पंचायत राज, रेल्वे सुरक्षा बल, तसेच इतर फ्रन्टलाइन वर्कर गटातील सुमारे वीस हजार लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे, मात्र अद्याप पहिलाही डोस घेतलेला नाही.