सोन्याच्या २९ पिशव्या गायब
By मिलिंदकुमार साळवे | Updated: September 12, 2017 22:08 IST2017-09-12T22:00:23+5:302017-09-12T22:08:03+5:30
गणोरे (ता. अकोले) येथील साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या पतसंस्थेत सहकाराचा ‘स्वाहाकार’ कसा झाला? याच्या सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. सोनेतारण कर्ज खात्यातील सोन्याच्या तब्बल २९ पिशव्या गायब आहेत.

सोन्याच्या २९ पिशव्या गायब
अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या पतसंस्थेत सहकाराचा ‘स्वाहाकार’ कसा झाला? याच्या सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. सोनेतारण कर्ज खात्यातील सोन्याच्या तब्बल २९ पिशव्या गायब आहेत.
चार्टर्ड अकाऊंटंट सुविद्या सोमाणी यांच्या एस. एस. सोमाणी अँड असोसिएटस् चार्टर्ड अकाऊंटंट या फर्मने दातीर पतसंस्थेचे ३१ मार्च २०१७ अखेरचे लेखापरीक्षण केले. त्यातून संस्थेची आर्थिक आरोग्यपत्रिकाच बाहेर आली आहे. त्यानुसार पतसंस्थेचे आर्थिक स्वास्थ्य खराब होऊन संस्था कोमात गेल्याचे निदान झाले आहे. फक्त गणोरे व परिसर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेचे जेमतेम ८१९ सभासद आहेत. एवढासा जीव असलेल्या या पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. हे घोटाळे पाहून हजारो सभासद असलेल्या पतसंस्था व सहकारी बँकांचे पदाधिकारी देखील आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागले आहेत.
जिल्हा बँकेच्या गणोरे व हिवरगाव (ता. अकोले) या दोन बँक शाखांमध्ये असलेल्या पतसंस्थेच्या मुदतठेव खात्यातील ४ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापाठोपाठ पतसंस्थेच्या सोनेतारण कर्ज खात्यातही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. २९ जणांच्या नावावर पतसंस्थेत सोनेतारण ठेऊन त्यांच्या नावाावर ५७ लाख ८७ हजार ३०२ रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. सोनेतारण कर्ज खात्याची तपासणी केली असता सोन्याच्या तब्बल २९ पिशव्या हिशोब करताना कमी आढळून आल्या आहेत. त्यातून ५७ लाख ८७ हजार ३०२ रूपयांचा अपहार झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार १९९३ ते मे २०१६ दरम्यानचा हा व्यवहार आहे. पण २०१३ ते २०१६ या तीनच वर्षात सोनेतारण कर्ज खात्यात सर्वाधिक उलाढाल आहे.
यांच्या नावावर आहे सोनेतारण कर्ज
मुक्ता कैलास शिंदे, विजय भास्कर उदावंत, सुनील सुकदेव काळे, भाऊसाहेब पांडुरंग नाईकवाडी, रोहिणी लक्ष्मण दातीर, कुंडलिक रखमा आंबरे, संकेत संजय जाधव, निवृत्ती मुरलीधर आंबरे, गणेश निवृत्ती रेवगडे, सुनील गंगाधर आहेर, मिलिंद नारायण दातीर, आबासाहेब रघुनाथ भालेराव, किशोर गोरख आहेर, राजेंद्र काशिनाथ कदम, संतोष देवराम आंबरे, कमलाकर भास्कर भालेराव, सचिन मुरलीधर काळे,
परवेज युनूस शेख, प्रदीप भाऊसाहेब आंबरे, शकुंतला पद्माकर फले, विशाल विठ्ठल काळे, संतोष शांताराम रंधे, सचिन मनोहर नवले, बाळासाहेब विश्वनाथ आंबरे, जमिर गुलाब मनियार, प्रवीण चिमाजी मालुंजकर यांच्या नावाने असलेल्या सोनेतारण कर्ज खाती असलेल्या सोन्याच्या २९ पिशव्या कमी आढळून आल्या आहेत. यातील किती नावे खरी व किती खोटी?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.