प्रति शेतकरी २५ टन कलिंगड बांधावरच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:24+5:302021-06-09T04:26:24+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरातील कलिंगड उत्पादकांना कोरोना काळातील ‘ब्रेक द चेन’चा फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ...

प्रति शेतकरी २५ टन कलिंगड बांधावरच पडून
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरातील कलिंगड उत्पादकांना कोरोना काळातील ‘ब्रेक द चेन’चा फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाजारपेठा बंद पडल्यामुळे कलिंगड शेतातच पडून आहे. आता झालेल्या पावसामुळे पुढील पिकांच्या नियोजनासाठी कलिंगड बांधावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्रत्येक कलिंगड उत्पादकाचा २५ टन माल शेतातच बांधावर पडून आहे.
गावातील किसन शिंदे, दीपक भालेराव यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनीही कलिंगड लागवड केली होती. शिंदे आणि भालेराव यांनी मेलोडी जातीची रोपे खासगी नर्सरीमधून उपलब्ध केली. प्रतिरोप तीन रुपयेप्रमाणे एकरी सहा हजार रोपांची १० मार्चच्या दरम्यान लागवड केली. साठ दिवसात उत्पादन हाती येईल या आशेने ठिबक सिंचन संच, मल्चिंग कागद, शेणखतासह, रासायनिक खतांचाही खर्च केला. उन्हाळ्यात पाण्यासाठी कसरत करून कष्ट घेऊन दर्जेदार फळे निर्माण केली. एकरी २५ टन उत्पादन अपेक्षित होते.
परंतु, ब्रेक द चेनमुळे बाजारपेठा बंद पडल्यामुळे अपेक्षित भाव मिळेनासा झाला. कलिंगड उत्पादनातून नफा तर नाहीच वाहतूक आणि काढणीचाही खर्च निघेना. मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळूनही हाती निराशा आली.
---
मार्च महिन्यात पपईमध्ये कलिंगडाचे आंतरपीक घेतले होते. ऐंशी हजार रुपये खर्च केला होता. १५ मे च्या दरम्यान फळे विक्रीसाठी तयार झाली. परंतु, भाव नसल्यामुळे शेतातच पडून होती. आता पपईच्या नियोजनासाठी कलिंगड बांधावर टाकत आहोत.
-किसन शिंदे,
कलिंगड उत्पादक, आढळगाव
----
फोटो आहे
अपेक्षित भाव मिळत नसल्याने आढळगाव येथील कलिंगड बांधावर टाकणारा शेतकरी.