१४ गुन्हे करणारा २२ वर्षीय लुटारू गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:27+5:302021-04-22T04:21:27+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस पथकाने १४ गुन्हे दाखल असलेेल्या एका बावीस वर्षीय तरुणाला भूम (जि.उस्मानाबाद) येथून अटक केली. शंकर ...

१४ गुन्हे करणारा २२ वर्षीय लुटारू गजाआड
श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस पथकाने १४ गुन्हे दाखल असलेेल्या एका बावीस वर्षीय तरुणाला भूम (जि.उस्मानाबाद) येथून अटक केली.
शंकर उर्फ हाड्या मधुकर पवार (वय २२, रा. पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर, हल्ली मुक्काम भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शंकर उर्फ हाड्या मधुकर पवार याच्याकडून श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथून चोरलेल्या चोरीच्या बुलेटसह नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून चोरलेल्या पाच दुचाकी, दोन मोबाईल असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन फरार साथीदारांसह चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
लोणी व्यंकनाथ येथील योगेश देवखिळे यांची एमएच १६, बीआर ९०११ ही बुलेट त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. त्याचदिवशी त्यांच्या गावातील काही लोकांचे मोबाईलही चोरीला गेले होते. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, दादा टाके, किरण बोराडे, प्रशांत राठोड या पोलीस पथकाने केला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल बडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ करीत आहेत.