जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात
By Admin | Updated: June 6, 2014 13:44 IST2014-06-05T19:40:36+5:302014-06-06T13:44:45+5:30
वादळी वार्यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे.

जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात
अहमदनगर : वादळी वार्यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे़ वादळी वारे व विजेच्या कडकडाटामुळे विद्युत रोहित्रे नादुरुस्त होऊन वीज पुरवठा विस्कळीत झाला असून, मध्यवर्ती शहरासह जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़
शहरासह जिल्ह्यात सध्या तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे़ त्यामुळे रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातो़ त्यात आता वादळी वार्यासह होणार्या पावसाचीही भर पडली आहे़ पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले असून, शहरासह जिल्हा अक्षरश: अंधारात चाचपडतो आहे़ पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित केला होता, हे विशेष़ दुरुस्तीचे काम होऊनही महावितरणची दाणादाण उडालीच़ वादळाने विद्युत खांब कोसळले़ काही ठिकाणी तारा तुटल्या़ त्यामुळे भर पावसात वीज गायब झाली़ त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली़ मध्यवर्ती शहरातील विद्युतभवनमधील रोहित्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास नादुरुस्त झाले़ मुळा धरणाकडे जाणारी वीज खंडित झाली़ वसंत टेकडीचे रोहित्रही बंद पडले़ परिणामी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला़ वसंत टेकडी येथील रोहित्र सुरू करण्यात कर्मचार्यांना पहाटे चार वाजता यश आले़ त्यामुळे काही भागाला पाणी देणे शक्य झाले़ सावेडी उपनगरातील रोहित्र रात्री ८़ ३० वाजता नादुरुस्त झाले़ त्यामुळे शेंडी गाव रात्रभर अंधारात होते़ जिल्ह्यात तर यापेक्षाही भयावह स्थिती असून, जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़
ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात भारनियमन सुरू आहे़ त्यात आता तातडीच्या भारनियमाची भर पडली़ त्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतानाच वादळी वार्याने वाड्या -वस्त्यांवरील वीज अचानक गायब झाली़ काल बुधवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील एक हजार १०० विद्युत खांब कोसळले़ तारा तुटल्या असून, वीजपुरवठा खंडित झाला़ विद्युतपुरवठा खंडित झालेल्या गावांची माहिती घेऊन दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ बहुतांश रोहित्र विजेच्या कडकडाटाने नादुरुस्त झाले आहेत़ आकाशातून पडणार्या विजेचा दाब प्रचंड असल्याने रोहित्र नादुरुस्त होतात़ ते दुरुस्त करणे शक्य आहे़ परंतु खांब उभे करून तारा जोडणे, ही कामे करणे कठीण आहे़ परिणामी ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागतील,असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे़