बांधकाम कामगारांच्या झोळीत २ कोटी ४७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:05+5:302021-05-27T04:23:05+5:30

अहमदनगर : कोरोनामुळे शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अनेक योजना सरकारी कार्यालयांत अडकल्या आहेत. मात्र, सरकारी ...

2 crore 47 lakhs in the pockets of construction workers | बांधकाम कामगारांच्या झोळीत २ कोटी ४७ लाख

बांधकाम कामगारांच्या झोळीत २ कोटी ४७ लाख

अहमदनगर : कोरोनामुळे शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे येत आहेत. अनेक योजना सरकारी कार्यालयांत अडकल्या आहेत. मात्र, सरकारी यंत्रणेने मनावर घेतल्यास काय होऊ शकते, याचा प्रत्यय जिल्ह्यातील बांधकाम कामगार घेत आहेत. जिल्ह्यातील १६ हजार ५०० कामगारांच्या बँक खात्यात २ कोटी ४७ लाख रुपये इतकी रक्कम झाली आहे. कामगारांना पैसेवाटप करण्यात अहमदनगर जिल्ह्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करताना हातावर पोट असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने कोट्यवधींचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये बांधकाम कामगारांचाही समावेश होता. बांधकाम कामगारांना सरकारने प्रत्येकी १५०० रुपये सानुग्रह आनुदान देण्याचा निर्णय घेतला. कामगार महामंडळाकडून थेट कामगारांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे, असे या योजनेचे स्वरूप होते. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होती. ऑनलाइन नोंदणी करणे, बँक खात्याची माहिती देणे, हे सर्व करणे बांधकाम कामगारांना खरंच शक्य आहे का, असा प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला गेला. मात्र, ही योजना सुरू झाल्यानंतर येथील कामगार कार्यालयाने जनजागृती करत कामगारांची माहिती घेऊन पोर्टलवर नोंदणी केली. योजनेला बांधकाम कामगारांचाही प्रतिसाद मिळाला. बांधकाम व्यावसायिकांनीही कामगारांची माहिती उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला सहकार्य केले. बांधकाम बंद असल्याने कामगारांची उपसमार होऊ नये, त्यांना वेळेवर सरकारी मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले गेले. परिणामी, जिल्ह्यातील १६ हजार ५०० कामगारांची न चुकता पोर्टलवर नोंदणी झाली. पोर्टलवर नोंद झालेल्या बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवातही झाली. एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व कामगारांच्या बँक खात्यात महामंडळाने सानुग्रह आनुदानाची २ कोटी ४७ लाख इतकी रक्कमही जमा केली. कोरोनाच्या कठीण प्रसंगात सानुग्रह आनुदानाची रक्कम कामगारांच्या हातात पडली, त्यामुळे कामगारांनाही काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळाला आहे.

....

शहरातील ४ हजार ५०० विडी कामगारांना प्रत्येकी १०० रुपयांची उचल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे विडी तयार करण्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे विडी कामगारांच्या हाताला काम नाही. नगर शहरात विडी कामगारांची संख्या मोठी आहे. कामगार कार्यालयाने पुढाकार घेऊन मालकांची बैठक घेतली. या संकटकाळात कामगारांना मालकांनी उचल देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मालकांसमोर ठेवला. मालकांनीही कामगारांना उचल देण्याची तयारी दर्शविली. विडी कामगारांना प्रत्येकी १ हजार रुपये आगाऊ देण्यावर एकमत झाले. मालकांनी कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपये उचल म्हणून दिली. ही रक्कम काम सुरू झाल्यानंतर परत करण्याची तयारी कामगारांनी दर्शविली असून, शहरातील साडेचार हजार कामगारांना अशी मदत देण्यात आल्याचे कामगार कार्यालयाकडून सांगण्यात आले.

...

- बांधकाम कामगारांची पोर्टलवर माहिती भरली. या माहितीच्या आधारे महामंडळाने जिल्ह्यातील १६ हजार ५०० कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा केले असून, कामगारांना पैसेवाटप करण्यात नगर जिल्हा नाशिक विभागात प्रथम आला आहे.

- राऊत, सहायक कामगार आयुक्त

Web Title: 2 crore 47 lakhs in the pockets of construction workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.