चारा छावण्यांसाठी १८ नवीन प्रस्ताव
By Admin | Updated: April 23, 2016 00:54 IST2016-04-23T00:28:53+5:302016-04-23T00:54:15+5:30
अहमदनगर : चारा, पाण्यासाठी उदार धोरण घेण्याच्या सूचना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातून छावण्यांसाठीच्या प्रस्तावांचा ओघ सुरू झाला आहे़

चारा छावण्यांसाठी १८ नवीन प्रस्ताव
अहमदनगर : चारा, पाण्यासाठी उदार धोरण घेण्याच्या सूचना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्यानंतर जिल्ह्यातून छावण्यांसाठीच्या प्रस्तावांचा ओघ सुरू झाला आहे़ जिल्ह्यातून नव्याने १८ प्रस्ताव शुक्रवारी दाखल झाले असून, ते अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत़
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चारा छावण्या व टँकरसाठी उदार धोरण घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास गुरुवारी दिले़ त्यामुळे छावण्या चालकांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला दिसतो़ छावण्यांच्या प्रस्तावांची तळाला असलेली संख्या शुक्रवारी वाढली़ एकट्या नगर तालुक्यातील छावण्यांचे १७ नवीन प्रस्ताव दाखल झाले आहेत़ कर्जत तालुक्यात नव्याने एक प्रस्ताव प्राप्त झाला असून, छावण्यांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत़ यापूर्वी जिल्हा प्रशासनाने ९ छावण्यांना मंजुरी दिली आहे़ त्यामुळे छावण्यांच्या प्रस्तावांची संख्या १७ वर पोहोचली आहे़
दक्षिण नगर जिल्ह्यातील कर्जत -जामखेड तालुक्यात छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ जामखेड तालुक्यात खर्डा, दरडवाडी, नागोबाचीवाडी येथे छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ कर्जतमध्ये कोंभळी व बहिरोबाचीवाडी येथे छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ नगर तालुक्यातील वाळकी, दहिगाव आणि जेऊरमध्ये छावण्या सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे़ नेवासा तालुक्यातील माका येथे छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ मात्र, तेथे छावण्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत़
(प्रतिनिधी)