१७ दुचाकी जळून खाक
By Admin | Updated: February 26, 2016 00:06 IST2016-02-26T00:02:01+5:302016-02-26T00:06:54+5:30
जामखेड : जामखेड तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सतरा दुचाकी आगीत जळून खाक झाल्या.

१७ दुचाकी जळून खाक
जामखेड : जामखेड तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सतरा दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. आगीचे कारण समजू शकले नाही. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
जामखेड तहसील कार्यालय व जामखेड पोलीस ठाणे यापूर्वी एकाच आवारात होते. यामुळे अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यासंबंधी सुमारे पन्नास ते साठ दुचाकी तहसील कार्यालयाच्या पाठीमागे जामखेड पोलिसांनी ठेवल्या आहेत. या दुचाकी अनेक वर्षांपासून पडून असल्याने या दुचाकींवर गंज चढून खराब झाल्या आहेत.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या पाठीमागे अचानक धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या धूळ खात पडून असलेल्या दुचाकी गाड्यांना आग लागल्याचे दिसून आले. यामुळे तहसील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
आग विझविण्यासाठी जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला बोलाविण्यात आले. बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
आगीच्या घटनेमुळे जामखेड तहसील कार्यालय आवारात एकच खळबळ उडाली.
(तालुका प्रतिनिधी)