अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांसह १५० कर्मचार्‍यांच्या बदल्या

By Admin | Updated: June 5, 2014 00:06 IST2014-06-04T23:10:17+5:302014-06-05T00:06:59+5:30

अहमदनगर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासह महसूलमधील १५० कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

150 employees transferred with additional collector | अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांसह १५० कर्मचार्‍यांच्या बदल्या

अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांसह १५० कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासह महसूलमधील १५० कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जगताप हे बीड येथील अंबेजोगाई येथे बदलून गेले. त्यांच्या जागेवर सोलापूरहून राजेंद्र भोसले बदलून येत आहेत. जगताप यांच्या बदलीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवारी (दि.३) आले होते. त्यांनी लगेच पदभारही सोडला. भोसले बुधवारी नगरला येणार होते. मात्र, ते सायंकाळपर्यंत हजर झाले नव्हते. गेली अडीच वर्षे जगताप हे नगरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी या काळात जमिनीचे बाराशेवर दावे निकाली काढले. खंडकर्‍यांच्या जमीन वाटपाचे कामही त्यांनी मार्गी लावले. आम आदमी, संजय गांधी, करमणूक करातही शंभर टक्क्यांवर वसुली केली. सरकारी कार्यालयांना जमिनी देण्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वनहक्काची ३ हजार ६७४ प्रकरणांची व्दितीय सुनावणी पूर्ण केली. खंडकर्‍यांचे जिल्ह्यात हरेगाव, साकरवाडी, बेलवंडी, चांगदेवनगर, टिळकनगर, लक्ष्मीनगर असे सहा मळे आहेत. यातील १२ हजार एकर जमिनीचे २ हजार शेतकर्‍यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. तब्बल ६३ गावांतील हे क्षेत्र होते. ते विहित मुदतीत पूर्ण करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. एकलहरे, श्रीरामपूर, पुणतांबा येथील वाटप बाकी आहे. चांगदेवनगरमधील ९० टक्के काम झाले आहे. उर्वरित कामे नवीन अपर जिल्हाधिकार्‍यांना पूर्ण करावी लागणार आहेत. जिल्ह्यातील तब्बल १५० कारकून, अव्वल कारकून, शिपाई, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांनाही मंगळवारीच बदलीचे आदेश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 150 employees transferred with additional collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.