जामखेडमध्ये १५ कोटींचा टँकर घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:25+5:302021-08-14T04:25:25+5:30

जामखेड : पाणीटंचाई काळात टँकरवाटपात पंचायत समितीमार्फत ९ कोटी, तर नगर परिषदेमार्फत ६ कोटी असा एकूण १५ कोटींचा भ्रष्टाचार ...

15 crore tanker scam in Jamkhed | जामखेडमध्ये १५ कोटींचा टँकर घोटाळा

जामखेडमध्ये १५ कोटींचा टँकर घोटाळा

जामखेड : पाणीटंचाई काळात टँकरवाटपात पंचायत समितीमार्फत ९ कोटी, तर नगर परिषदेमार्फत ६ कोटी असा एकूण १५ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांनी केली आहे.

२०१९ मध्ये पाणीटंचाई काळात वीट उत्पादकांच्या मोटार वाहतूक संस्थेने टँकर वाहतुकीच्या बिलाच्या रकमेची केलेली ४० टक्के कपात मागे घेऊन फक्त १० टक्क्यांप्रमाणे कपात करावी. उर्वरित रक्कम टँकरचालकांना मिळावी, या मागणीसाठी मुरूमकर यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसीलसमोर टँकर चालक-मालक उपोेषणास बसले होते. प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेतली. संबंधित संस्थेला चौकशीसाठी बोलावून जिल्हा टंचाई शाखेला अवगत केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

उपोषणात टँकरमालक बब्रुवान संपत साळुंके, सतीश वैद्य, बाळकृष्ण नेटके, अविनाश कडभणे, संतोष पवार, दिलीप पवार, प्रकाश ढवळे, नंदकुमार गोरे, रमेश ढगे, बाबुराव भोंडवे, भरत जगदाळे, राजेंद्र ढवळे, भास्कर ढवळे, केरबा जाधव, संतोष महादेव पवार आदींनी सहभाग घेतला.

यावेळी डॉ. भगवान मुरूमकर म्हणाले, जामखेड तालुका वीट उत्पादक वाहतूक संस्थेकडे टँकरमालकांनी टँकर लावले होते. या संस्थेने मात्र टँकरची बिले अदा करताना तब्बल ४० टक्के इतकी कपात करून बिले दिली. संस्थेने टँकरचालकांना नियमाप्रमाणे प्रतिटन २३० रुपये दर शासकीय असताना १४५ रुपये टनाने पैसे दिले. तसेच डिझेलसाठी सरकारी दर ५१.५९ रुपये किलोमीटर असताना २७ रुपये किलोमीटरप्रमाणे पैसे दिले. अनेक वेळा टँकरचालकांनी पैशांची मागणी केली. मात्र, संस्थेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे संस्थेची सखोल चौकशी करावी व संस्थेला काळ्या यादीत टाकून टँकरचालकांची नियमानुसार बिले मिळावीत. प्रशासनाने चार दिवसांत दखल न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----

१३ जामखेड उपोेषण

जामखेड तहसील कार्यालयासमोर माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्यासह टँकरमालकासह उपोषणास बसले होते.

Web Title: 15 crore tanker scam in Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.