घोडेगाव कांदा मार्केटमध्ये १४५ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:24+5:302021-09-10T04:27:24+5:30
नेवासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अटी व नियमांनुसार सुरू झालेल्या नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये ...

घोडेगाव कांदा मार्केटमध्ये १४५ कोटींची उलाढाल
नेवासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अटी व नियमांनुसार सुरू झालेल्या नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मागील तीन महिन्यात झालेल्या ३८ दिवसांच्या लिलावात १२ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातून १४५ कोटींची उलाढाल झाली.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते. ५ जूनपासून नियम व अटींच्या आधारे लिलाव सुरू झाले. आठवड्यातील सोमवार, बुधवार व शनिवार असे तीन दिवस कांदा लिलाव असतो. कांदा लिलावाच्या दिवशी नगर-औरंगाबाद महामार्गावर कांदा घेऊन आलेल्या टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर या वाहनांच्या रांगा दुतर्फा लागतात. या मार्केटमुळे घोडेगाव व परिसरातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. व्यावसायिक, दुकानदार, कांदा बारदान विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, हमाल, ट्रकचालक, टेम्पोचालक यांसारख्या अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
काही वर्षांपासून खुली लिलाव पद्धत, विक्री पश्चात त्वरित पेमेंट यामुळे नेवासा तालुक्यासह श्रीगोंदा, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांसह गंगापूर, वैजापूर, कन्नड, बीड, औरंगाबाद, पैठण येथून कांद्याची आवक होते. उच्च प्रतीचा कांदा, योग्य व्यवस्थापन यामुळे स्थानिक सात, तर इतर राज्यांतून ३५ व्यापारी येथे कांदा खरेदीसाठी येतात. येथील कांदा आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, हैदराबाद आदी भागात पाठविला जातो. सध्या कमीत कमी क्विंटलला ५०० ते ७०० रुपये, तर जास्तीत जास्त १८०० ते २००० रुपये भाव मिळत आहे.
------
मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथे सुरू असलेल्या कांदा मार्केटमध्ये राज्यात सर्वाधिक कांदा आवक होते. ही कृषी बाजार समितीच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. नेहमी शेतकरी हितास प्राधान्य हे आमचे प्रथम उद्दिष्ट असून, रोख पेमेंट व विश्वासार्हता यामुळे कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
- देवदत्त पालवे,
सचिव, बाजार समिती, नेवासा
-------
..अशी झाली उलाढाल
महिना गोणी आवक उलाढाल वजन क्विंटल
जून ६,३७,९२५ ४२,५१,४८,००० ३,५४,२९०
जुलै ६,९१,६१५ ४६,६८,४०,००० ३८,९०३४
ऑगस्ट ८,४१,११५ ५७,१५,०६,००० ४,७६,२५५
---
सध्या असा मिळतोय भाव..
मोठा कांदा (उन्हाळी)- १६५०-१७००
मध्यम मोठा- १५०० - १६००
मध्यम- १४५० - १५००
गोल्टा/गोल्टी- ९००-१४००
जोड- ३००-४००
-----
०९ घोडेगाव कांदा