बाह्यवळणासाठी १४ कोटी मंजूर
By Admin | Updated: July 8, 2014 00:32 IST2014-07-07T23:39:44+5:302014-07-08T00:32:01+5:30
अहमदनगर: शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामास नकार देणाऱ्या विकासकावर नियमानुसार कारवाई करण्याचे सक्त आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले आहेत़
बाह्यवळणासाठी १४ कोटी मंजूर
अहमदनगर: शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामास नकार देणाऱ्या विकासकावर नियमानुसार कारवाई करण्याचे सक्त आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिले आहेत़ बाह्यवळणच्या मजबुतीकरणासाठी १४ कोटींच्या निधीलाही त्यांनी मंजुरी दिली असून, शहरातून जाणारी अवजड वाहतूक यामुळे बाह्यवळण रस्त्यावरून वळविणे शक्य होणार आहे़
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत वरील निर्णय झाला़ जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड, महापौर संग्राम जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए़ आऱ नाईक, मुख्य अभियंता पी़ वाय़ देशमुख, अधीक्षक अभियंता हरिष पाटील, कार्यकारी अभियंता ए़ एस़ खैरे बैठकीस उपस्थित होते़ नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत पवार यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत मुंबईत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते़ या पार्श्वभूमीवर मुंबईतील सह्याद्री अतिथी भवनात पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी बैठक झाली़ यावेळी उड्डाण पुलाचे काम न करता टोल वसुली करण्यास परवानगी दिली कशी? असा सवाल उपस्थित करत पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली़ सक्कर चौक ते कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलाचा खर्च ७५ कोटीवर पोहोचला आहे़ त्यामुळे विकासकाने हे काम करण्यास नकार दिला आहे़ विकासकाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी कालावधी कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ तसेच पुलाच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे मान्य केले होते़ परंतु पवार यांनी पुलाचे काम ठेकेदाराच्या माथी मारले असून,न्यायप्रविष्ट असलेल्या उड्डाणपुलाबाबत प्रशासन काय करवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ बाह्यवळण रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी ४ कोटी आणि रस्त्याच्या शेंडी ते पुणे मार्गावरील पॅचिंगसाठी हा निधी देण्यात आला आहे़ नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम करण्यास नकार देणाऱ्या संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत़
बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी १४ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांना दिले आहेत़ त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असून, शहर विकासाच्या योजनांबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे महापौर जगताप यांनी सांगितले.
पुलाच्या कामास विलंब झाला़ परिणामी खर्चात वाढ झाली़ करारात अट असूनही काम करण्यास विकासकाने नकार दिला़ पण याविषयी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत़ त्यामुळे विकासकाने टोकाची भूमिका घेतली असून, संबंधित ठेकेदारासोबत झालेल्या कराराचा अभ्यास करून संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्याचे यावेळी ठरले़ तसे आदेश पवार यांनी दिले आहेत़ याशिवाय बाह्यवळण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १३ व्या वित्त आयोगातून १४ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ रस्त्याचे मजबुतीकरण करून शहरातील अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यावरून वळविण्याच्या सूचनाही पवार यांनी केल्या आहेत़
चर्चेतील ठळक मुद्दे
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी तरतूद
(शेंडी ते पुणे) बाह्यवळण रस्त्याची दुरुस्ती
निंबळक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे मजबुतीकरण
कोठी ते सक्कर चौक उड्डाणपुलाबाबत चर्चा
विकासकावर कारवाईचे आदेश
शहर विकासासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा
अधिकाऱ्यांची पवार यांच्याकडून कानउघडणी