वर्षभरात जिल्ह्यात १३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: February 21, 2016 23:48 IST2016-02-21T23:41:30+5:302016-02-21T23:48:13+5:30

अहमदनगर : दुष्काळाच्या दृष्टचक्राबरोबरच ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे़

138 farmers suicides in the district this year | वर्षभरात जिल्ह्यात १३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

वर्षभरात जिल्ह्यात १३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अहमदनगर : दुष्काळाच्या दृष्टचक्राबरोबरच ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे़ गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १३८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी सहा आत्महत्या मागील एका आठवड्यात झाल्या आहेत़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहता सततच्या संकटाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जगविण्यासाठी कुणी पुढे येणार की नाही? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे़
उन्हाळ्याच्या सुरुवातीला मागील आठवड्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले़ सततच्या नैसर्गिक आपत्तीने बळीराजा पुरता हतबल झाला आहे़ ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडले आहे़ दक्षिण नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाचवीला पुजलेलाच आह़े पण यंदा त्यात उत्तरेतील तालुक्यांचीही भर पडली आहे़ प्रवरा नदी काठच्या बागायती पट्ट्यातील राहुरी तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी जीवनयात्रा संपविली़ दुसऱ्या दिवशी पाथर्डी येथील टाकळीमानूर तर राहुरी तालुक्यातील पाथरी गावातील शेतकऱ्याने कर्जबाजरीपणाला कंटाळून आत्महत्या केली़
आत्महत्यांचे सत्र गेल्या जानेवारीपासून सुरू आहे, ते अद्याप थांबले नाही़ गेल्या १४ महिन्यांत १३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़
कुणी बोअरवेलचे पाणी अचानक गेले म्हणून तर सर्वाधिक आत्महत्या कर्जबाजारीपणाने केल्याचे प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे़
मागील वर्षभरात एकाही शेतकऱ्याच्या पदरात काही पडले नाही़ अवेळी पाऊस पडला़ जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली़ त्यामुळे खरीप हंगामातील पेरलेले उगवले नाही़ पिकांवर केलेला खर्च वाया गेला़
सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला म्हणून जामखेड, कर्जत, पारनेर आणि नगर तालुक्यातील रब्बीची पेरणी वाढली़ मात्र त्यानंतर पाऊस पडलाच नाही, त्यामुळे ही पिके गेली़ दक्षिण नगर जिल्ह्याची ही स्थिती आहे़ उत्तरेतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़
उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा आणि भंडारदरा धरणात पुरेसे पाणी होते़ मात्र, ते शेतीला मिळाले नाही़ दोन्ही धरणांतून पाणी जायकवाडीसाठी सोडले गेले़ सोडलेल्या पाण्यापैकी जायकवाडीत किती पोहोचले, हा संशोधनाचा विषय आहे़ मात्र, दोन्ही धरणांतील पाणी गेल्याने त्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला़ पाण्याच्या भरवशावर घेतलेले उसाचे पीक आले नाही़ थोड्याफार पाण्यावर कांद्याचे पीक घेतले़ मात्र पाण्याअभावी कांद्याचाही वांदा झाला़ कांद्याने बाजारात जाण्याआधीच शेतकऱ्यांना रडविले़ गहू, हरभरा यांसारखी पिके घेतली, पण त्यांना शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडले़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात प्रथमच आत्महत्या
नगर जिल्ह्यात प्रथमच शेतकरी आत्महत्यांचे लोण सुरू झाले आहे़ बळीराजाने १९७८ मधील दुष्काळ अनुभवला़ या भीषण दुष्काळात शेतकरी खंबीरपणे उभा राहिला़ मात्र अलीकडच्या काळात शाश्वत सिंचनाची सोय, पुरेसा वीजपुरवठा हजारोंनी जाहीर होणाऱ्या शासकीय योजना बांधावर पोहोचवून बळीराजा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी शासनाने उचलायची पावले, याबाबत कुठलीच हालचाल दिसत नसल्याने शेतकरी जगण्याचा आत्मविश्वास गमावून बसला आहे़

Web Title: 138 farmers suicides in the district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.