जिल्ह्यात एक पालक गमाविलेली १२६ मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:16+5:302021-06-20T04:16:16+5:30
कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. अशा कोरोनाकाळात पालकांच्या ...

जिल्ह्यात एक पालक गमाविलेली १२६ मुले
कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील मुलांचे पालकत्व हरवले आहे. काही कुटुंबात तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे. अशा कोरोनाकाळात पालकांच्या मृत्युमुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींची अगदी गाव पातळीपासूनची माहिती संकलित करून ती जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे सादर कऱण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनीही अशा मुलांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडकाळात पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तर कृतीदलाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीला यंत्रणेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची देखभाल करणाऱ्या नातेवाइकांचीही माहिती संकलित करून या मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची माहिती घेऊन त्याची नोंद तपासणी अहवालात घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य, हक्क मिळवून देऊन त्यांचे योग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने उपाययोजना आवश्यक आहेत. त्या बालकांना बाल संगोपन योजनेंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (टास्क फोर्स)स्थापना करण्यात आली आहे. अशा बालकांना तातडीने मदत देण्यात येणार आहे. या दृष्टिने अधिकाऱ्यांनी गृहभेटी कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
तसेच, घरातील कर्ता पुरुष कोरोनामुळे गमावल्याने विधवा झालेल्या महिलांनाही राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनाने पालकत्व गमावलेल्या मुलांची माहिती संकलित केली जात असून, त्यांची सामाजिक तपासणीही केली जात आहे.