अहमदनगर : शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसामुळे ऐरणीवर आला असून, २२ धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ११० रहिवासी वास्तव्यास असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. अतिधोकादायक असलेल्या १२ इमारती त्वरित उतरवून घेण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मध्यवर्ती शहरात जुने वाडे व इमारती धोकादायक बनल्या आहेत. मागील आठवड्यात पावसाळामुळे एका धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला होता. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीचा काही भागा उतरवून घेतला. पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून इमारतींची पाहणी केली जाते. त्यासाठी त्रयस्थ अभियंत्यांचीही नेमणूक करण्यात आलेली आहे. इमारतींचे परीक्षण करून धोकादायक ठरविण्यात येत असतात. याही वर्षी पालिकेने २२ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केलेले आहे. यापैकी १२ इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. बहुतांश धोकादायक इमारतींबाबत मालक व भाडेकरू, असा वाद आहे. त्यामुळे इमारती उतरवून घेण्यात अडचणी येत असून, काहींनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. अशा इमारतींबाबत पालिकेलाही निर्णय घेता येत नाही. त्यामुळे धोकादायक इमारती ‘जैसे थे’ आहे. धोकादायक इमारतींत नागरिक वास्तव्यास आहेत. पावसामुळे इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, याची कल्पना तेथे राहणाऱ्या रहिवाशांनाही आहे; परंतु नाइलाजाने ते धोकादायक इमारतीत राहत असून, यावर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे; परंतु हा निर्णय घेणार कोण, असा प्रश्न आहे.
....
शहरातील धोकादायक इमारती
२२
...
अतिधोकादायक इमारती
१२
...
धोकादायक इमारतीत राहणारे रहिवासी
अंदाजे-११०
..
सर्व काही माहीत आहे; पण जाणार कुठे?
महापालिकेने इमारतींचे परीक्षण करून धोकादायक ठरविल्या आहेत. याबाबत रहिवाशांना माहितीही देण्यात आली आहे; परंतु इमारत पाडून जाणार कुठे, असा तेथे राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न आहे. मालकी हक्काचा वाद निकाली निघत नसल्याने भाडेकरू तिथेच राहत असून, त्यांनाही नाइलाज आहे, असे सांगण्यात आले.
...
वारंवार नोटिसा देऊनही इमारती ‘जैसे थे’
महापालिकेकडून धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षीही नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु इमारती उतरवून घेतल्या जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे इमारती उभ्या असून, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
...
शहरातील १२ अतिधोकादायक इमारत मालकांना इमारत त्वरित उतरवून घेण्याबाबत नाेटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या अद्याप उतरविण्यात आलेल्या नाहीत.
- श्रीकांत निंबाळकर, अभियंता, महापालिका