शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

ओवाळते भाऊराया रे!

By दा. कृ. सोमण | Updated: October 20, 2017 05:27 IST

शनिवार, दि. २१ आॅक्टोबर, कार्तिक शुक्ल द्वितीया, यम द्वितीया- भाऊबीज! ‘ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया’ या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण यमी हिच्या घरी गेला आणि त्याने आपल्या बहिणीला भाऊबीज म्हणून मौल्यवान वस्त्रालंकार दिले आणि तिच्या घरी आनंदाने भोजन केले, अशी पुराणात कथा आहे.

 बहीण-भावाचे नाते दृढ करण्यासाठी आपल्याकडे दोन सण साजरे केले जातात. एक भाऊबीज आणि दुसरा रक्षाबंधन! रक्षाबंधनाचा सण हा मूळचा महाराष्ट्राचा नाही. तो राजस्थान, गुजरातमधून महाराष्ट्रात आला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण राखी बांधण्यासाठी आपल्या भावाच्या घरी जाऊन भावाच्या हातात प्रेमाची-मायेची राखी बांधते. तर भाऊबीज या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भाऊबीज घालण्यासाठी बहिणीच्या घरी जातो. बहीण त्याला ओवाळते आणि भाऊ तिला भाऊबीज घालतो. कुटुंबातील भावा-बहिणीचे नाते चांगले राहावे, यासाठी हा सण साजरा करावयाचा असतो.भाऊ आणि बहीण यांच्या वयाप्रमाणे भाऊबीज साजरेपणाचे रूप बदलत जाते. अगदी लहान असताना हा सण साजरा करताना आपण काय करतोय, हेही त्या वेळेस कळत नसते; पण गंमत जास्त वाटत असते. तुम्हाला तुमच्या बालपणीची भाऊबीज आठवतेय का? त्या वेळी आईवडील यांचे जास्त लक्ष असायचे. नवीन कपडे घालून छोटा दादा पाटावर बसायचा. डोक्यावर टोपी आणि हातात बहिणीला द्यायचे गिफ्ट किंवा पैशाचे पाकीट असायचे. आई एका तबकात निरांजन, अक्षता, सुपारी ठेवून, छोट्या ताईकडून दादाला ओवाळण्यासाठी मदत करायची. निरांजनाची ज्योत सांभाळत भाऊबीज कार्यक्रम पार पडायचा.काही वर्षे निघून गेल्यानंतर मग हीच भावंडे कॉलेजमध्ये जायला लागली की, भाऊबीज कार्यक्रमाचे स्वरूप थोडे बदलायचे. मस्ती, हट्टीपणा, दंडेली वाढलेली असायची. दादा, मला मोठ्ठी भाऊबीज घातलीस, तरच मी तुला ओवाळीन! ताई म्हणायची. दादा कमवायला लागेपर्यंत भाऊबीज किती द्यायची ते सर्वस्वी आईवडिलांच्या मतावरच असायचे; पण मग दादाला नोकरी लागल्यानंतर दादा स्वत:च्या कमाईची ‘मोठ्ठी’ भाऊबीज देणे सुरू व्हायचे. आणखी काही वर्षे गेल्यानंतर दादावर माया करणारी त्याची ताई सासरी जायची. मग मात्र भाऊबीज सोहळा अधिक प्रेमळ बनायचा. जिव्हाळा अधिक वाटायचा. ताईच्या विवाहानंतर पहिल्याच वर्षी ताई, माहेराहून दादा भाऊबीजसाठी येणार म्हणून वाट पाहत बसायची. दादाला पाहताच ताई कौतुकाने त्याच्याकडे पाहायची. आपले वृद्ध आई-बाबा कसे आहेत, विचारपूस व्हायची. भाऊबीज समारंभ हृदयस्पर्शी असायचा. ताईच्या डोळ्यात पाणी यायचे. दादाही अस्वस्थ व्हायचा; पण चेहºयावर उसने हसू आणायचा. लहानपणी एकत्र वाढलेल्या, वेगवेगळ्या दिशेने प्रवास करणाºया या पाखरांना भाऊबीज सण एकत्र आणायचा.आणखी काही वर्षे जायची. दादा-ताई दोघेही वृद्ध झालेली. दादाला प्रवास करणे कठीण जायचे; पण भाऊबीज हा सण मनाबरोबरच शरीरात ताकद निर्माण करायचा. भाऊबीज सण जवळ यायचा. दादा आता संथपणे चालायचा. दादा ताईकडे यायचा. दरवर्षी म्हणायचा पुढच्या वर्षी येता येईल, असे नाही. तरीही त्याचे येणे व्हायचेच. अनेक वर्षांची परंपरा शरीर थकले तरी कशी मोडली जाईल. ओवाळताना त्या वृद्ध ताईचा हात थरथरायचा. पूर्वी ताईची मुलं मामासोबत गप्पा मारायची; पण आता ती मुलेही मोठी झालेली! त्यांना मामाशी गप्पा मारायला वेळ नसायचा. ‘दादा, आपल्या तब्बेतीची काळजी घे रे’ताईचे हे मायेचे शब्द सांभाळत दादा आपल्या घरी पोहोचायचा! दरवर्षी दोघांनाही वाटायचे पुढच्या भाऊबीजला आपण असू की नाही? मनाला सावरूनच दादा-ताई एकमेकांचे निरोप घ्यायचे.मी ही गोष्ट मागच्या पिढीतल्या दादा-ताई यांच्या भाऊबीजेची सांगितली. त्या वेळेस एकत्र कुटुंब पद्धत होती. त्या वेळी मोबाइल नव्हता. व्हॉट्स अ‍ॅप नव्हते. फेसबुक नव्हते. सारा संवाद पोस्टकार्डानेच व्हायचा. तार फक्त बातमी घेऊन यायची. पुढच्या पिढीला या गोष्टी सांगितल्या, तर त्यांचा विश्वास बसणार नाही. दादा-ताईची मायाही तितकीच वेडी असायची. ताईच्या पायाला ठेच लागली की, दादाच्या डोळ्यांतून पाणी यायचे.बदलती दिवाळीआता काळ बदलला, त्याप्रमाणे माणसेही बदलली. दादा बदलला. ताई बदलली. भाऊबीजेचा ‘इव्हेंट’ बदलला. त्या वेळी दिवाळीत तेलाच्या पणत्या प्रकाश द्यायच्या. आता मेणाच्या पणत्या प्रकाश देऊ लागल्या. किंवा घरा-खिडक्यांवर चायनीज माळा प्रकाश देऊ लागल्या. त्या वेळी आकाशकंदील बांबू तासून, खळ तयार करून, कागद चिकटवून घरी बनवला जायचा आणि त्यामध्ये ठेवलेली पणती कंदिलाला प्रकाश द्यायची. आता दिवाळीला आकाशकंदिलांची दुकाने प्रत्येकाच्या मदतीस येत असतात. त्या वेळी दिवाळी जवळ आली की, रोज स्वयंपाक घरातून गोड किंवा खमंग वास यायचा. आता तयार फराळ विकत आणणेच सोईचे वाटू लागते. पूर्वी दिवाळीला सर्व जण एकत्र येऊन संवाद व्हायचा. आता दिवाळीतही व्हॉट्स अ‍ॅप फेसबुक वरूनच संवाद साधत असतात. पूर्वी कुटुंबातील भावंडे एकमेकाला सांभाळून घ्यायची. आता स्वकेंद्रित वृत्ती वाढू लागली आहे. पूर्वी दिवाळीसारख्या सणाला घरातील वृद्धांना नमस्कार करून सुरुवात व्हायची. आता वृद्धांची दिवाळी वृद्धाश्रमात साजरी होत असते. दिखाऊपणाही थोडा वाढलेला दिसून येतो. हवामानाचेही तसेच आहे. माणसांबरोबर तेही बदलले आहे. पूर्वी दिवाळीत अभ्यंगस्नान करताना खूप थंडी लागायची. आता तर दिवाळी साजरी करायला प्रत्यक्ष पाऊस येत असतो. ‘बदल’ ही एकच गोष्ट जगात कायम टिकणारी आहे. हे जरी खरे असले, तरी बहीण-भावाची माया टिकविणारा भाऊबीचेचा सण मात्र त्याला अपवाद म्हणावा लागेल.पुढील दीपावलीयावर्षी दीपावलीचा सण लवकर आल्यामुळे प्रारंभी पावसाने थोडी गैरसोय केली; परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आल्याने दीपावली १९ दिवस उशिरा येणार आहे. ‘लोकमत’च्या वाचकांसाठी पुढील दहा वर्षांतील बलिप्रतिपदेचे दिवस पुढे देत आहे.१. गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१८२. सोमवार, २८ आॅक्टोबर २०१९३. सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०४. शुक्रवार, ५ नोव्हेंबर २०२१५. बुधवार, २६ आॅक्टोबर २०२२६. मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३७. शनिवार, २ नोव्हेंबर २०२४८. बुधवार, २२ आॅक्टोबर २०२५९. मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६१०. शनिवार, ३० आॅक्टोबर २०२७

टॅग्स :diwaliदिवाळीDeepotsav 2017दीपोत्सव 2017