Would you enjoy happiness? | मिळेल का आपल्याला आनंदाचा परीस?
मिळेल का आपल्याला आनंदाचा परीस?

- रमेश सप्रे

कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी यासारखी आणखी एक कल्पना आहे ती म्हणजे परीस. हा एखाद्या मण्यासारखा असतो. हिंदी भाषेत याला म्हणतातच ‘पारसमणी’. याचं वैशिष्टय़ म्हणजे याचा स्पर्श लोखंडाला किंवा लोखंडी वस्तूला झाला की ती वस्तू सोन्याची बनते. असा हा लोखंडाचं सोनं बनवणारा अद्भूत परीस. 

साहजिकच परीसाच्या शोधाच्या अनेक सुरस आणि मनोरंजन गोष्टी अनेक भाषांतल्या वाङ्मयात आढळतात. मिडास राजानं तर देवाची उपासना करून असा परीसस्पर्श प्राप्त केला होता. त्या वरदानाचा प्रयोग अनेक वस्तूंवर यशस्वीपणे केल्यावर आपण आता सा-या जगातले श्रीमंत राजे बनणार म्हणून तो आनंदात होता; पण हा खरा आनंद होता का? कारण जेवायला बसल्यावर जेव्हा हातातल्या घासाचं नि पेल्यातल्या पाण्याचं पेल्यासकट सोनं झालं तेव्हा त्याला आपली चूक लक्षात आली; पण जेव्हा लाडकी मुलगी प्रेमानं जवळ आली तेव्हा तिला स्पर्श केल्यावर तिचंही सोनं झालं तेव्हा त्याला पश्चाताप झाला.  देवाकडे प्रार्थना करून तो परीसस्पर्शाचा वर परत घ्यायला सांगितल्यावर तो शांत झाला. 

राजा विक्रमादित्यानं गुरूंच्या सांगण्यावरून प्रचंड मेहनत व साहस करून दूरवरच्या गुहेत अधांतरी ध्यानस्थ बसलेल्या ऋषीकडून झाडाची एक जादूई मुळी मिळविली. तीही अशीच स्पर्शानं लोखंडाची सोनं करायची; पण त्याला एक अट होती स्वार्थासाठी, स्वार्थी हेतूनं जर तिचा प्रयोग केला तर ती परत ऋषीकडे जाणार होती. विक्रमादित्य प्रजेवर प्रेम करणारा राजा असतो. अनेक लोखंडी गोण्याचं सोनं करून त्याची चलनी नाणी बनवून ती जनतेत वाटून त्यानं सर्वाना श्रीमंत बनवलं होतं. एक दिवस आपल्याइतकं समृद्ध दुसरं राज्य असणंच शक्य नाही अशा सर्वात संपन्न राज्याचे आपण सम्राट आहोत असा स्वार्थी, अहंकारी विचार त्याच्या मनात आला. तत्क्षणी ती मुळी आकाशात उडाली नि गुहेतल्या ऋषीकडे परत आली. 

या गोष्टींची शिकवण उघड आहे असा परीस नि त्याच्यामुळे मिळालेलं अगणित सोनं यातून सुखोपभोगाच्या वस्तू, आरामदायी सेवा मिळू शकतील. पण मन:शांती, आनंद कधीही मिळणार नाही.  विज्ञान क्षेत्रातही असं किमयागार रसायन (आल्केम) बनवण्याचा प्रयत्न गेली अनेक शतकं चालू आहे. तो यशस्वी होईल की नाही याबद्दल काहीही निश्चित सांगता येणार नाही. पण समजा यशस्वी झाला तरी मानवजातीचं खरं कल्याण किती होईल हा प्रश्नच आहे. कारण केवळ सोनं, पैसा किंवा कामनातृप्तीची इतर साधनं मन:शांती, समाधान देऊ शकत नाही याचा अनुभव आपण सारे आत्तापर्यंत घेत आलो आहोत. 

राजा ययातीचं महाभारतातील उदाहरण हे या दृष्टीनं योग्य मार्गदर्शन करणारं आहे. देहाच्या सा-या इच्छा तृप्त करणारी साधनसामग्री उपलब्ध असूनही ही उपभोगाची आग शांत होत नाही. देहाचे भोग तृप्त न होता अधिकाधिक अतृप्तीचाच अनुभव येतो. हे ययाती टाहो फोडून जगाला सांगतोय पण मानवाचा प्रवास विरुद्ध दिशेनंच सुरू आहे.  मग परीस एक कल्पना म्हणून सोडून द्यायची की ‘आनंदाचा परीस’ ज्या कुणाला मिळालेला असेल त्यांची जीवनं पाहायची? असं करायचं तर साधुसंतांकडेच वळावं लागेल. भगवंत गीतेत सांगून राहिलेत की स्थिरबुद्धीतून आनंद प्राप्तीसाठी वृत्ती कशी हवी तर ‘समलोष्टाश्मकांचन’ अशी हवी. याचा अर्थ लोष्ट म्हणजे मातीचं ठिगळ किंवा माती अश्म म्हणजे पाषाण किंवा दगड नि कांचन म्हणजे सुवर्ण किंवा सोनं. याचा अर्थ ज्या व्यक्तीला माती-दगड-सोनं (म्हणजे हिरेमोती इ. सारं) एकाच किमतीचं वाटतं. सोनं फार मौल्यवान धातू किंवा वस्तू वाटतं नाही तिलाच आनंद अनुभवता येतो. 

शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या घरची गरीबी पाहून जिजामातांच्या आज्ञेवरून सोनेनाणे अलंकार यांनी भरलेलं ताट त्यांना भेट म्हणून पाठवलं. तुकारामांना शिवराय गुरू मानत असत. पत्नी आवली हिचा तो नजराणा स्वीकारण्याचा आग्रह असूनही तुकोबांनी ‘सोनेनाणे आम्हा मृत्तिके (माती) समान’ असं म्हणून ते ताट परत पाठवलं. शिवरायांनी पुन्हा एकदा अशीच भेट पाठवल्यावर तुकारामांनी अधिक कडक शब्द वापरून ती परत केली. ते म्हणाले, ‘सोनेनाणे आम्हा सुकराच्या (डुकराच्या) विष्ठेसमान.’ अशा वृत्तीमुळे तुकारामाचं जीवन कसं होतं ‘आनंदाचे डोही आनंद तरंग!’ सुवर्णसंधी; एखादा प्रसंग सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. इतिहासाची सोनेरी पानं, विज्ञान संशोधनातील सुवर्णक्षण किंवा सोन्यासारखा माणूस अशा शब्दप्रयोगातून ज्या सोन्याचा उल्लेख केला जातो. ते खरं अनुभवाचं सोनं आहे त्याचा ध्यास आपण घ्यायला हवा. यातून मिळतो तो शुद्ध आनंद!

ज्ञानदेवांसारखे संत जेव्हा श्रोत्यांशी संवाद साधताना म्हणतात ‘परीसा हो अवधान देऊन’ किंवा ‘परीसा हो तुलसी रामायण’ असं म्हटलं जातं तेव्हा ती भावपूर्णतेनं, लक्षपूर्वक ऐकण्याची (परीसण्याची) क्रियाच असतो खरा परीस आनंदाचा! मुलांच्या, विद्याथ्र्याच्या, ग्राहकांच्या, रुग्णांच्या किंवा अनुयायांच्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर पालकांनी, शिक्षकांनी, व्यापा:यांनी, डॉक्टरांनी (सर्व व्यावसायिकांनी) अन् नेते मंडळींनी स्वत: आनंदाचा परीस बनायला काय हरकत आहे? विचार करू या. 


Web Title: Would you enjoy happiness?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.