जग जग माझ्या जीवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 05:31 AM2019-10-14T05:31:37+5:302019-10-14T05:31:42+5:30

मनुष्याचे जीवन ही निसर्गाने दिलेली जगातील सर्वांत अमूल्य देणगी, भेट आहे. इतर सर्व देणग्या देता-देता संपतात किंवा दिल्यानंतर देणारा ...

The world is my life | जग जग माझ्या जीवा

जग जग माझ्या जीवा

Next

मनुष्याचे जीवन ही निसर्गाने दिलेली जगातील सर्वांत अमूल्य देणगी, भेट आहे. इतर सर्व देणग्या देता-देता संपतात किंवा दिल्यानंतर देणारा आणि घेणारा आपल्या कर्माने त्यांना संपवितो; पण आयुष्य हाच एक विधात्याचा प्रसाद आहे असे मानणारे आनंदयात्री बुद्ध, महावीर, बसवेश्वर, ज्ञानेश्वर, कबीर, तुकाराम आदींनी दु:खाचे कढ गिळीत आयुष्याचे गाणे सुरेल केले आणि ज्यांच्या आयुष्याच्या सतारीच्या तारा तुटलेल्या आहेत, त्यांना पुन्हा जोडून सर्वसामान्यांच्या जगण्यात सूर निर्माण करण्याचे काम केले. या साऱ्या प्रासादिक वाणीच्या प्रबोधन यात्रींना आयुष्य कधी ओझे वाटले नाही, तर जीवनाच्या वाटेवरील साºया प्रश्नचिन्हांवर मात करीत जीवन हे जगण्यासाठी आणि इतरांना जगविण्यासाठी असते हा सकारात्मक संदेश सर्व धर्मांतील सर्व सत्पुरुषांनी दिला. ज्याला आयुष्य मरणाची तमा वाटत नाही, तो मरणाला तर जिंकतोच, पण जगतानासुद्धा आयुष्याच्या वस्त्रात स्वसामर्थ्याचे धागे विणताना बहिणाबार्इंच्या शब्दांत म्हणतो -
जग जग माझ्या जीवा, असं जगणं मोलाचं ।
उच्च गगनासारखं, धरतीच्या रं तोलाचं ॥
मानवी जीवनात स्वसामर्थ्याचा जो उदात्त हुंकार आहे, तो देवी-देवतांच्या जीवनातही नाही आणि पशू-पक्ष्यांच्या जीवनात तर मुळीच नाही. म्हणून ‘माणसाला’ केवळ ईश्वराचा प्रतिनिधीच मानले जात नाही, तर प्रत्यक्ष प्रतिसृष्टीकर्ता ईश्वरच मानले जाते. जन्माला आल्यानंतर ज्यांची सावली हरवलीय अशांची माउली होण्यात मनुष्य जन्माची जी धन्यता आहे, ती देवळाच्या दाराला सोन्याचा पत्रा मारण्यात नाही. ज्यांच्या घरात जन्मोजन्मीचा अंधार पसरलाय, त्यांच्या हातात ज्ञानाची पणती देण्यात मनुष्य जन्माची जी धन्यता आहे, ती स्वत:भोवती शिष्यांचे टोळके गोळा करून चमत्कारांच्या सुरस कथा रंगविणाºया तथाकथित गुरूबाजीत नाही. दु:खितांच्या साºया आभाळभर दु:खावर जरी मला पांघरूण नाही घालता आले, तरी त्यावर एक फुंकर मारण्यात माझ्या जन्माची सार्थकता आहे असे ज्या-ज्या मनुष्याला वाटते, त्याचे मनुष्याच्या जन्माला येणे सार्थकी लागले असे समजावे. याउलट सज्जनांच्या वाटेत काटे पसरून त्यांचे पाय रक्तबंबाळ झाल्यानंतर ज्यांचे दात दिसतात, अशी माणसे ‘अ‍ॅक्सिडेंट’ म्हणून माणसाच्या जन्माला आलेली असतात. आयुष्याचा हिशेबच जर मांडायचा असेल, तर त्यांनी आयुष्यातील मुद्दलही गमावली व व्याज गमावले असे समजावे. आपल्या खांद्यावर मानवतेची पताका घेऊन अत्यंत प्रसन्न मनाने आणि समाधानी शरीराने आयुष्याची वाटचाल करणारे असे महामानव आयुष्याच्या प्रवासातील मैलाचे दगड ठरतात, जे नेहमी आयुष्याचा प्रवास किती झाला? कसा झाला? व पुढे कसा होणार याचे मार्गदर्शन करतात. आम्ही मात्र मैलाचे दगड होण्यापेक्षा दुसºयाच्या वाटेतील दगड होतो. त्यामुळेच आम्हाला आयुष्याची खोली व गतीही कळत नाही. याउलट समाजजीवनात सात्त्विकतेचे चांदणे शिंपीत, साºया मानवजातीतच प्रसन्नतेची बीजे पेरणारे संत मात्र म्हणत राहतात -
उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवडा ।
बोलविले बोले बोल, धनी विठ्ठला सन्निध ।
तरी मनी नाही शंका, बळे एका स्वामीच्या
तुका म्हणे नये आम्हा, पुढे कामा गबाळ ॥
त्यांच्या दृष्टीने आयुष्य नावाचे कोडे सहज भावनेने ओथंबून गेले की सहज सुटून जाते. ऊन, वारा, थंडी, पाऊस यांच्याशी एकरूप होता-होता आयुष्याच्या झाडाला हिरवीगार पाने, फुले, फळे यावीत आणि वेळ आल्यानंतर गळून पडावीत तसे स्थूल शरीराने ते जगाचा निरोप घेतात.

-प्रा. शिवाजीराव भुकेले

Web Title: The world is my life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.