- प्रा. शिवाजीराव भुकेलेमला एका तीर्थक्षेत्री गमतीशीर शिल्प दिसले. ते शिल्प म्हणे चित्रगुप्ताचे होते. त्याच्या हातात एक तराजू होता व तो स्वर्गलोकांच्या पर्वतावर तो तराजू घेऊन बसला होता. पर्वताला बरोबर मध्यभागी एक घळ होती. न राहवून मी एका आजोबांना विचारलेच, ‘आजोबा, या शिल्पातून नेमका काय बोध घ्यायचा?’ आजोबा म्हणाले, ‘अरे वेड्या बोध नाही घ्यायचा; खिशातून एक रुपयाचे नाणे काढायचे व तराजूकडे फेकायचे. उजव्या तराजूत नाणे पडले की आपण पुण्यवान आणि डाव्या तराजूत पडले की पापी.’ आजोबा एकीकडे हे पाप-पुण्य पुराण भरभरून सांगत होते आणि मी एक-एक रुपया फेकणाऱ्या भोळ्या भाविकांचे निरीक्षण करत होतो. बहुतेकांचा रुपया स्वर्गलोकांच्या पर्वताच्या घळीत अर्थात मध्यभागी पडत होता आणि पाच-दहा सेकंदात नष्ट होत होता. म्हणून आजोबांना मध्येच थांबवून न राहवून मी म्हणालो, ‘रुपया जर दोन्ही तराजूंच्या मध्यभागी पडला तर? तर आजोबा पटकन उद्गारले, ‘फिफ्टी-फिफ्टी : पाप-पुण्य फिफ्टी-फिफ्टी’. मग मला उलगडा होत गेला की, आम्ही नेमके ‘फिफ्टी-फिफ्टी’मध्ये अडकलो आहोत. जेव्हा पापाचे अपचन होते तेव्हा पुण्याईची ‘टॅबलेट’ घेण्यासाठी असंख्य मंडळी देव-धर्माच्या नावाने उदो-उदो करतात व पुण्याईच्या राशीच्या पाठीमागे लागतात. खरे तरपुण्य परोपकार पाप ते परपिडा ।आणिक नाही जोडा दुजा यासी ॥सत्य तोचि धर्म-असत्य ते कर्म ।आणिक हे वर्म नाही दुजे ॥तुका म्हणे, उघडे आहे हित यात ।जया जे उचित करा तैसे ॥या तुकोबांच्या वचनांप्रमाणे दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू बघून आपले डोळे चटकन डबडबले की आपण पुण्यवान आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. दुसºयाला सुखी पाहून ज्याला इहलोकात आणि परलोकांतसुद्धा सुखाची अनुभूती येते तोच खरा पुण्यवान होय. ‘तुका म्हणे, सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे’ या वचनाप्रमाणे ज्याचे हात आशीर्वादासाठी उंचावतात व पाय अभेदरूप देवत्वाच्या गावाला जातात तो खरा पुण्यवान.
विद्वानांचे साहित्य आत्मसात केल्यास होईल पुण्यवान समाजाची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:01 IST