Understanding emotions can save the relationship | भावना समजून घेतल्यानेच नात्यातील ओलावा टिकेल
भावना समजून घेतल्यानेच नात्यातील ओलावा टिकेल

- सचिन व्ही. काळे

आज प्रत्येक व्यक्तीचे जीवन फार धकाधकीचे आणि व्यस्त झाले आहे. मोबाईलच्या या युगात व्यक्ती इतका गुंतून गेला आहे की, त्याला मान वर करायला सुद्धा वेळ नाही. इतका तो व्यस्त झाला आहे. या व्यस्ततेमुळे व्यक्ती हळू हळू आपल्या नाजूक अशा भावना कुठे तरी हरवून बसला आहे. येत्या काळात या सर्व गोष्टींमुळे होणारे दुष्परिणाम हळू हळू नाते संबंधावर दिसू लागले आहेत. सततच्या या व्यस्ततेमुळे व्यक्ती उग्र, हिंसक व भावना शून्य होत आहे. आपण काय बोलतो ? काय करतो ? हेच त्याच्या लक्षात येत नाहीए. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा आपल्या कुटुंबावर खोल असा परिणाम होत आहे. हे त्याच्या लक्षातच घेत नाहीए. मित्रांशी, नातेवाईकांशी प्रत्यक्ष भेटून बोलून जेवढे सुख, आनंद मिळतो. हे त्याच्या लक्षात न येता तो अडकून पडला आहे. ते मेसेज, इमोजी, स्टेट्स, सेल्फी यांसारख्या अभासी विश्वात. या माध्यमातून तो आपल्या भावना व्यक्त करू पाहत आहे. या सर्व गोष्टी म्हणजेच जग, खऱ्या भावना, स्वतःला समजून घेण्याचे व व्यक्त होण्याचे माध्यम, हेच आपले सर्वस्व असे त्याला वाटू लागले आहे. 
  

खरंच या गोष्टी म्हणजेच भावना, खरे जग का ? पूर्वीच्या काळी या गोष्टी नव्हत्या तरी हे जग चालूच होते ना ? जपल्याच जात होत्या ना एकमेकांच्या भावना ? होतेच ना एकमेकांचे एकमेकांवर प्रेम ? करतच होते ना एकमेकांचा आदर ? मग आज जग इतके जवळ येऊनही, का व्यक्ती आपल्याच माणसांपासून दूर जात आहे ? रोज रोज एकमेकांना मेसेज, इमोजी,फोन करून ही व्यक्ती आज आपल्याच प्रिय म्हणवणाऱ्या व्यक्ती पासून का दूरावलेला दिसतो ? का सोबत असूनही, एकमेकांमध्ये असणारा दुरावा वाढलेला दिसतो ? याचे मुख्य कारण म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, मीच योग्य आहे, मी जे करतो तेच योग्य आहे, माझ्या म्हणवणाऱ्या माणसांना माझ्या भावनाच समजतच नाही, मीच सर्वाना समजून घेतो, मलाच का कुणी समजून घेत नाही ? असल्या प्रश्नांमध्ये तो स्वतः स्वतःला अडकवून घेत आहे आणि स्वतःच इतरांपासून कायमचे दूर जात आहे.
    

खरे तर असे प्रश्न जेव्हा पडू लागतात तेव्हा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हे लक्षात यायला हवे की, त्याचा संबंध त्याच्या सारख्याच भावना प्रधान व्यक्तींशी असतो. त्यांचे ही आपल्या सारखे मन आहे, आपल्या सारख्या इच्छा आहे, आपल्या सारख्या आकांक्षा आहेत, स्वप्नं आहेत, मन आहे. हेच तो विसरून जातो. तसेच समोरच्या व्यक्तीच्या एका साध्या शब्दाने ज्या प्रमाणे त्याचे मन दुखावते. त्याच प्रमाणे आपल्या ही शब्दांनी आपल्या प्रिय व्यक्तींचे मन नकळतपणे दुखावले जात असेल ना ? ज्या प्रमाणे स्वतःला एक आधार हवा असतो. त्याच प्रमाणे आपला ही आधार कुणा आपल्यालाच प्रिय व्यक्तीला हवा असेल ना ? नकळतपणे कधी तरी आपल्या भावना कुणी तरी समजून घ्याव्यात, असे जेव्हा त्याला वाटते. त्याच वेळी आपण ही कुणाच्या भावना नकळतपणे समजून घ्याव्यात असे त्याच्या प्रिय व्यक्तींना वाटतंच असेल ना ? हेही त्याला समजायला हवे. संकटाच्या काळात हवा असणारा धीर, मदत ज्याप्रमाणे त्याला हवी आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आपल्या प्रिय व्यक्तींना ही तीच मदत, तोच आधार हवा असेल ना ? नुसता भावनिक आधार आपल्यालाच हवा नसून, आपल्या कडून ही कुणाला याच गोष्टींची अपेक्षा आहे. हे प्रत्येक व्यक्तीला लक्षात यायला हवे. फक्त स्वतःचे मन, स्वतःच्या भावना, स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, दुखः याला कुरवाळत न बसता. आपल्या मनाचा जास्त विचार न करता. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा, त्याच्या भावनांचा विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास, त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा, स्वप्नं, दुखः, मन, भावना यांचा समोरची व्यक्ती न सांगता विचार करेल. हे त्याच्या लक्षात यायला हवे. दूर गेलेली नाती मेसेज, इमोजी, स्टेट्स, सेल्फी यांच्या फंदात न पडता अपोआप जवळ येतील व वाटणारा एकटेपणा कमी होऊन, त्याला काही गमावण्याची भीती निर्माण होणार नाही. त्यासाठी व्यक्तीला स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच आज नात्यांमध्ये निर्माण होणारी दरी कमी होईल. त्यासाठी व्यक्तीला आपली सतत खाली असलेली मान वर करावी लागेल. मेसेज, इमोजी, स्टेट्स, सेल्फी याच्या मोहजालात न अडकता भावनांच्या सागरात जेव्हा व्यक्ती उतरेल व समोरच्या व्यक्तीच्या मनरुपी खोल समुद्राची खोली शोधण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच नात्यांमधील ओलावा टिकून राहील व हे जग सुंदर आणि भावनाप्रधान होईल.

( लेखकाचा संपर्क क्रमांक 9881849666 )
 


Web Title: Understanding emotions can save the relationship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.