- डॉ. दत्ता कोहीनकर
सुदामचे वय ३५ वर्षे झाले होते, लग्न जुळतच नव्हते. कायमस्वरूपी नोकरी नसल्याने पैशाचीही चणचण भासे. शेतीत पण म्हणावे तसे उत्पादन निघत नसे. त्यामुळे घरातही त्याला फारशी किंमत उरली नव्हती. मित्राकडून घेतलेली उसनवारी वेळेवर परत न केल्यामुळे त्यांचे अपशब्द ऐकायला लागत होते.आपले नशिबच फुटके - आपण दरिद्री - कर्जबाजारी - कर्तृत्वशून्य अशा विचारांची वादळे सुदामच्या डोक्यात चालता-चालता नकारात्मक विचारांचे वादळ उठायचे व त्याला नैराश्य यायचे. तो जास्त नकारात्मक विचारांकडे ओढला जायचा. त्यामुळे शारीरिक स्तरांवर देखील सुदाम वारंवार आजारी पडायचा. त्याच्या भावभावनांचे दमन व्हायचे. त्यामुळे सुदामच्या नकारात्मक विचारांचा मानस तयार होऊ लागला. त्यामुळे शेवटी सुदामला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. मानसोपचार तज्ज्ञांची उपचारपद्धती व औषधे यासाठी सुदामला आईचे दागिने विकावे लागले. सुदामला रोज मानसोपचार तज्ज्ञांची औषधे घ्यावी लागतात... मित्रांनो..... जसा तुम्ही विचार कराल त्या प्रकारच्या तरंगाशी तुम्ही समरस होऊ लागता. भगवान बुद्ध म्हणतात, सब्बो लोको प्रकंपीतो (सर्व विश्व हे तरंग आहे, प्रकंपन आहे.) रेडियोच्या सुईला फिरवताना जे स्टेशन तुम्हाला ऐकायचे असेल त्या स्टेशनवर सुई आणतात व प्रक्षेपण चालू होते. निसर्गात विविध प्रकारच्या तरंगाचे वहन चालू असते. तुमचा विचार हा पण एक तरंगच असतो. त्यामुळे नकारात्मक विचाराला थारा न देता त्याला सकारात्मक करा. नकारात्मक विचारांना सकारात्मक करणे यालाच तुकाराम महाराज ‘रात्रंदिन आम्हा, युद्धाचा प्रसंग’ (मनाचे - मनाशीच युद्ध) असे संबोधतात. मनात रोज २४ तासांत ६०,००० विचार येतात त्यातील ६० % विचार हे नकारात्मक असतात. त्याला सकारात्मक करण्याची कला अवगत नसेल, तर सुदामसारखी अनेक माणसे नैराश्यात (ताणतणावात) जातात म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक करून वर्तमानकाळात अंतर्मनाला सूचना दिल्याने त्या प्रकारच्या विचारांच्या कर्मफळाला गती येते. पूर्वी लोक म्हणायचे, तुम्ही जो विचार कराल त्याला वास्तुपुरूष तथास्तू म्हणतो. आपल्या विचारांना प्रतिसाद देऊन त्या प्रकारच्या कर्मफळाला आपण आपल्या आयुष्यात ओढत असतो. म्हणून वर्तमानकाळात सकारात्मक विचार करणे याची कला अवगत करणे ही एक साधनाच होय. या साधनेचा जास्तीत जास्त सराव करा. लोकसंख्येच्या १ % माणूस हा ठार वेडा व ३३ % सीमारेषेवर आहेत. जगातल्या १० % लोकांना झोपच येत नाही. आत्महत्या खूप वाढल्या आहेत, मधुमेह-उच्चरक्तदाबाचे रूग्ण भारतात सर्वाधिक आहेत. लहान मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरूण वर्ग हिंसा करू लागला आहे. गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांनी शरीराबरोबरच मनाची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणतात ना ‘मन चिंती ते वैरी न चिंती’, ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’, हजार युध्द जिंकण्यापेक्षा मनाचे एक युद्ध जिंकणे सर्वश्रेष्ठ असते. म्हणून शरीराबरोबर मनाची काळजी घेणे आवश्यक असते.