Sky: An Outstanding Chance | आकाश : एक अमर्याद संभावना
आकाश : एक अमर्याद संभावना

- सद्गुरू जग्गी वासुदेव

शहरांमध्ये राहणारे लोक हल्ली आकाशाकडे पाहतसुद्धा नाहीत. ते ट्यूबलाइटच्या प्रकाशातच रमलेले असतात. तुम्ही सर्व दिवे बंद करून रात्री आकाशाकडे टक लावून पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की ती एक अमर्याद संभावना आहे. ती एक अशी अनाकलनीय, अविश्वसनीय आणि अगदी रहस्यमय गोष्ट आहे की हे रहस्य उलगडण्याचा कोणताही मार्गच नाही. तुम्ही कधीच असे म्हणू शकत नाही की तुम्ही त्याबद्दल थोडेफार जाणता. जेव्हा तुम्हाला त्याबद्दल काहीसे माहीत झाले आहे असे वाटते, त्याच क्षणी तुमच्या लक्षात येते की आकाशाबद्दल अनेक माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्या प्रत्ययाला येतात. आणि तुम्ही पाहाल, आकाशाबद्दल तुम्हाला नकळलेल्या गोष्टी; कळलेल्या गोष्टींपेक्षा लक्षावधी पटीने जास्त आहेत. हेच आकाशाचे अद्भुत सौंदर्य आहे. आकाश ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे कारण ती एक अमर्याद शक्यता आहे. ते जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक प्रकारे झाला़ सत्य शोधण्याचा प्रयत्न झाला़ पण त्याला मर्यादा आल्या़ आकाश हे काही कोणत्या प्रकारचे छत नाही की ज्याला तुम्ही जाऊन स्पर्श करू शकता. ती एक असीमित संभावना आहे. ते अमर्याद आहे. आध्यात्मिक प्रक्रिया या गोष्टी भिन्न नाहीत. अनंताचा शोध घेणे आणि आध्यात्मिक ओढ असणे हे एकमेकांपासून निराळे नाहीत. जर तुम्ही आकाशाकडे लक्षपूर्वक पाहिले तर या सृष्टीची रचना पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि जेव्हा सृष्टी-रचना पाहून तुम्ही थक्क होता, तेव्हाच तुम्हाला सृष्टीकर्त्यामध्ये खरेखुरे स्वारस्य निर्माण होते. तोपर्यंत ते केवळ तुमच्या संस्कृतीशी निगडित विचारांचे मंथन असते जे निरर्थक आहे.


Web Title: Sky: An Outstanding Chance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.