आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:09 AM2019-02-20T11:09:43+5:302019-02-20T11:10:00+5:30

आनंदाचं रहस्य एकच आनंद हवा तर इतरांना आनंद द्यायला हवा. आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही. आनंदायन हे महादान आहे. 

Simple Ways to Make Your Life Happier | आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही

आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही

Next

रमेश सप्रे

रुग्णालयाचा एक विभाग. त्यात फक्त जीवनाच्या अंतिम अवस्थेतले, अत्यवस्थ रुग्ण. विभागाला नावही समर्पक दिलं होतं दक्षिणायन. आत येण्यसाठी एक रुंद दार. कारण रुग्णांना चाकाच्या पलंगावरून आणावं लागायचं. समोरच्या भिंतीत एक मोठी खिडकी, तिला टेकून एक बेड आणि इतर काही बेड त्या वॉर्डात होते. काही रुग्ण असाध्य रोगानं आजारी असले तरी बेडवर उठून बसू शकत होते. त्या खिडकीशेजारच्या बेडवर जीवनाची अखेर जवळ पोचलेला रुग्ण होता. तो अधून मधून उठून त्या खिडकीतून बाहेर पाही. तेथील दृश्याचं मोठं रसभरीत वर्णन तो आपल्या सहरुग्णांना सांगत असे. 

समोर एक बाग आहे. रंगीबेरंगी सुंदर फुलं उमललेली आहेत. फुलांपेक्षा जिवंत असलेली अनेक मुलं खेळताहेत. त्यांच्यासाठी घसरगुंडी, सीसॉ, झोपाळा अशी खेळणीही आहेत. संध्याकाळी बागेत नाचणाऱ्या कारंज्यावर निरनिराळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडले आहेत. त्यात उजळलेली बाग पाहायला आलेल्या दर्शकांचे चेहरेही प्रसन्न दिसताहेत. फुगेवाले, मेरी गो राऊंड, गोल फिरणारे प्राणी, त्यावर बसलेली ओरडणारी, घाबरणारी मुलं मजेदार दिसताहेत. असं त्याचं प्रत्यक्ष पाहिलेल्या दृष्याचं वर्णन इतर रुग्णांची मनं सुखावत असे. सर्वांना ते ऐकताना वेदनांवर कोणीतरी प्रेमळ फुंकर मारतोय असं वाटत असे. 

त्या रुग्णातल्या एका रुग्णाला आपणही ती दृश्यं पाहावीत अन् इतरांची मनं प्रसन्न करावीत असे वाटे. 

एके दिवशी खिडकीतून दिसणाऱ्या एका मैदानाचं वर्णन तो रुग्ण करत होता. एरवी ओसाड भकास वाटणारं मैदान कसं जिवंत झालंय. मुलांच्या खेळामुळे ते चैतन्यमय कसं झालंय याचं वर्णन एखाद्या खेळाच्या ऑँखो देखा हाल (रनिंग कॉमेंट्री) सारखा तो करत होता. अनेकांना आपले तरुणपणचे मैदानी खेळ आठवले. ‘गेले ते दिन गेले’ या विचारानं काही रुग्णांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले.

आता तर ज्याला खिडकी जवळील बेड हवी होती त्यानं नर्सला बोलावून म्हटलं ‘सिस्टर, माझ्या आधी त्याला मृत्यू आला तर कृपया माझा बेड तिथं न्या. मलाही खिडकीबाहेर दिसणारी अनेकरंगी, अनेक ढंगी दृश्यं पाहून सर्वाना सांगायची आहेत. 

काही दिवसांत तो खिडकीजवळचा रुग्ण काळाच्या पडद्याआड गेला. नर्सनं या रुग्णाची बेड खिडकीजवळ हलवली. या रुग्णाला बाहेरील दृश्य पाहण्याची एवढी उत्सुकता लागून राहिली होती की तो कसाबसा उठून बसला. त्यानं खिडकीतून बाहेर नजर टाकली तर त्याला काय दिसलं? खिडकीसमोर शेजारच्या इमारतीची एक खिडकी सुद्धा नसलेली आंधळी भिंत (ब्लाइंड वॉल) होती. पुढचं काहीही दिसत नव्हतं. त्यानं नर्सला बोलावून विचारलं, हा काय प्रकार आहे? खिडकीतून तर समोरच्या भिंतीशिवाय काहीच दिसत नाही. मग या आधीच्या रुग्णाला बागेची, मैदानाची निरनिराळी दृश्यं कशी दिसत होती?’

यावर ती नर्स शांतपणे म्हणाली, ‘यापेक्षा आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे माहिते का? तो रोगी आंधळा होता. आपली कल्पनाशक्ती वापरून आपल्या सहरुग्णांच्या जीवनात थोडी उभारी, थोडा आनंद निर्माण व्हावा म्हणून तो हे सारं करत होता. त्यात त्यालाही अतीव आनंद मिळत होता.’

हे ऐकून तो रुग्ण प्रथम सुन्न झाला. नंतर त्यानं विचार केला की आपणही आपली कल्पना वापरून रसरशीत वर्णन करत राहू या अन् आरंभ केला देखील. किती सुंदर मिरवणूक निघालीय! कसला तरी विजयोत्सव साजरा करत असले पाहिजेत. समोर चाललेले घोडे, त्याच्या अंगावर छातीला रंगीबेरंगी झुली, गळ्यात मधुर ध्वनी निर्माण करणाऱ्या घंटा, झगमगीत रोषणाईने विविध रंगी दिवे, कर्णमधुर संगीत, नाचत गात जाणारी मंडळी असं वर्णन चालू होतं. अनेकांना आपल्या लग्नातील वरात किंवा दुसऱ्यांच्या मिरवणुकीत किंवा शोभायात्रेत आपण सामील झालेल्या स्मृती जाग्या झाल्या. सर्वाना बरं वाटत होतं. एरवीच्या वेदनांचा काही काळ विसर पडला होता. या नव्या रुग्णालाही आनंदाचा उगम मिळाला होता. 

इतरांना आनंदी बनवूनच आपण आनंदी बनू शकतो. त्यासाठी सहसंवेदना कल्पकता यांचा वापर जरूर करावा. आपल्यातील कलाकौशल्य उपयोगात आणावीत. एकूण काय आनंदाचं रहस्य एकच आनंद हवा तर इतरांना आनंद द्यायला हवा. आनंद देण्यासारखा दुसरा आनंद नाही. आनंदायन हे महादान आहे. 

Web Title: Simple Ways to Make Your Life Happier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.