स्वधर्म
By Admin | Updated: August 9, 2016 14:07 IST2016-08-09T14:07:36+5:302016-08-09T14:07:36+5:30
अनेकांना आपापला धर्म श्रेष्ठ व पवित्र वाटतो. ‘धरून ठेवतो तो धर्म’ त्या-त्या धर्माचे चांगले आचार-विचार मनात रूजवून जी व्यक्ती तशी वागते त्या व्यक्तीस धार्मिक म्हणावे,

स्वधर्म
>- प्रा. डॉ. यशवंत पाटील
अनेकांना आपापला धर्म श्रेष्ठ व पवित्र वाटतो. ‘धरून ठेवतो तो धर्म’ त्या-त्या धर्माचे चांगले आचार-विचार मनात रूजवून जी व्यक्ती तशी वागते त्या व्यक्तीस धार्मिक म्हणावे, असा सर्व संत वाङमयाचा आशय व सारांश आहे. पण ‘स्वधर्म’ म्हणजे स्वत: अतिशय काटेकोर, शिस्तबद्ध करावयाचे एखादे स्वीकृत कार्य अथवा काम.
‘माझ्या वैयक्तिक धार्मिक पूजे-अर्चेपेक्षाही ‘स्वराज्य’ प्राप्तीचा माझा प्रयत्न ही माझी सर्व श्रेष्ठ पूजा आहे’, असा स्वधर्म सांगणारे लो. टिळक, दु:खी, पीडितांची सेवा करण्यात संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज इ.नी ‘स्वधर्म’ ओळखला. कुष्ठरोग्यात कै. बाबा आमट्यांना ‘स्वधर्म’ दिसला. ‘स्वधर्म’ निष्ठेने, आयुष्यभर पाळणारी अशी अनेक उदाहरणे विविध लहान-मोठ्या क्षेत्रात आहेत. क्षेत्र झगमगाटी असेल, नसेलही पण त्यात स्वीकारलेला स्वधर्म श्रेष्ठ असतो.
एकदा रामकृष्णांकडे काही खेडूत आले, कालीमातेचे दर्शन घेऊन एका शेतकऱ्याबाबत ते तक्रार करू लागले की, त्या शेतकऱ्याला येथे दर्शनास येण्याचा आग्रह करूनही तो येथे न येता त्याच्या शेतात काम करीत राहिला. त्यावर रामकृष्ण म्हणाले, ‘असू दे त्याने काही बिघडत नाही. तो त्याचा शेतात राबण्याचा ‘स्वधर्म’ तर करतो आहे ना? खरं तर येथे दर्शनास येण्यापेक्षा तुम्हा सर्वांनाच त्या स्वधर्माची खूप गरज आहे.’ ते खेडूत काय समजायचे ते समजून चुकले.
न्याय निष्ठूर रामशास्त्री प्रभुणे जेव्हा-जेव्हा पेशव्यांना भेटण्यास जात तेव्हा तेव्हा पेशवे पूजेअर्चेत असल्यामुळे त्यांना तीन-चार तास त्यांची वाट पहात थांबावे लागे. एकदा त्यांनी नम्रपणे, ठामपणे पेशव्यांना सांगितले, ‘श्रीमंत ! आपण रयतेचे पालनपोषणकर्ते, यातला बराच वेळ त्यांच्यासाठी दिला तर ते अधिक योग्य ठरेल.’ अशा शब्दात पेशव्यांना त्यांच्या स्वधर्माची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा ‘स्वधर्मयज्ञी’ राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘स्वधर्म प्रथम आचरावा । तद्नंतर विठ्ठल भजावा ।।’ या संत उक्तीप्रमाणे जर झाले तर तीर्थस्थळावर होणारी गर्दी कमी होईल व अनेक कार्ये सुरळीत होतील.