The sadness of ignorance | अज्ञानाचे दु:ख
अज्ञानाचे दु:ख

- सद्गुरू जग्गी वासुदेव

बहुतांश लोकांना अज्ञानात असण्याच्या दु:खाची जाणीव नसते. कारण ते स्वत:ला त्यांच्या श्रद्धा, धारणांमध्ये झाकून घेतात. श्रद्धा प्रणाली तुम्हाला कधीच मुक्त करीत नाहीत; पण त्या तुम्हाला तात्पुरता दिलासा देतात. ‘‘अरे! देव माझी काळजी वाहतो आहे, माझ्या वडिलांचा आत्मा माझी काळजी घेत आहे.’’ अशा श्रद्धा तुम्हाला शांत झोपी घालतील, पण त्या तुम्हाला मुक्त करणार नाहीत. त्या फक्त तुम्हाला अडकवून ठेवतील. तुम्ही मुक्ती शोधत असाल, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट डोळे उघडून, ती जशी आहे तशी बघणे आवश्यक आहे. पण वास्तविक पाहता, तुम्हाला स्वत:बद्दल काहीच माहीत नाही. तुम्ही जर या वास्तविकतेचा स्वीकार केलात आणि तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठून आलात आणि कोठे जाणार आहात, हे माहिती नसण्याचे दु:ख तुम्ही जाणता, आणि तरीही तुम्ही तुमचा जीवनक्र म चालूच ठेवता, जणू सारे काही ठीक आहे, तर ती एक भयंकर गोष्ट ठरेल. ही वास्तविकता जर तुमच्यात भिनली आणि तुम्हाला छळायला लागली, तर मग तुम्ही ते सत्य जाणून घ्यायला, काहीही करायला तयार व्हाल. आणि मग ज्ञान फार दूर नसेल; कारण ते इथे याच ठिकाणी आहे. ते सत्य जर पर्वतावर बसले असेल, तर मग तुम्हाला पर्वत चढता येतो की नाही हा प्रश्न उद्भवेल. पण जेव्हा ते इथेच उपलब्ध आहे, तेंव्हा तुम्हाला ते मिळू शकेल का नाही हा प्रश्नच नाही. मुद्दा इतकाच आहे की तुम्हाला ते हवे आहे का आणि किती हवे आहे एवढंच. तुम्हाला नेमकं काय हवं आहे तेसुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं. त्यासाठी ज्ञान लागतं. ज्ञान मिळविण्यासाठी तशी लालसा लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धा, धारणा प्रणालींच्या आधारे देव, आत्मा आणि परमात्माबद्दल स्वत:लाच फसवत असता, ज्या गोष्टी तुम्ही कधीही पाहिल्या किंवा अनुभवल्या नाहीत तेव्हा सत्य जाणण्याची उत्सुकता असणार नाही. म्हणूनच ते ज्ञात नाही.


Web Title:  The sadness of ignorance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.