भावनेचे शुद्धीकरण : कर्मकांड व प्रतिकांद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:15 PM2019-02-16T23:15:48+5:302019-02-16T23:20:02+5:30

धर्म-अध्यात्माचा मूळ उद्देश हा मनुष्याच्या अंतरंगात मानवी अथवा दैवी गुणांची स्थापना करणे आहे. हे काम म्हणावे तितके सोपे नाही. मनुष्याची वैचारिक व भावनिक जडणघडण ही काही प्रमाणात अनुवंशिकरीत्या तर बऱ्याच प्रमाणात लहानपणापासून मिळणाऱ्या संस्कार व शिक्षणाने होत असते. संस्कार व शिक्षण म्हणजे काही ठराविक ज्ञान मुलांच्या मेंदूत भरणे नव्हे. जशा प्रकारचे वातावरण तो जास्तीतजास्त काळ अनुभवत असतो, त्याचेच अंकन त्याच्या अंतरंगावर संस्काराच्या रूपाने होत असते. जंगल बुक पुस्तकातील ‘मोगली’ हे मानवी पात्र याचे उत्तम उदाहरण आहे. ठराविक प्रकारच्या चिंतनाला एकाग्रपणे आपल्या अंतरंगात सामावून घेण्याचा सराव वारंवार केल्याने सुद्धा हळूहळू आमच्या चिंतन, चारित्र्य व वागणुकीत बदल घडून येत असतो. सत्संग, श्रेष्ठ साहित्याचे वाचन, ध्यानधारणा अशा प्रकारांना याकरिताच व्यक्तिमत्त्व निर्मितीमध्ये महत्त्वाचे मानले जाते.

Purification of emotion: By rituals and symbols | भावनेचे शुद्धीकरण : कर्मकांड व प्रतिकांद्वारे

भावनेचे शुद्धीकरण : कर्मकांड व प्रतिकांद्वारे

Next
ठळक मुद्देपरमेश्वराचे प्रतीक : चराचर सृष्टीतील नदी,पर्वत, दगड, वनस्पती व प्राणीजगतप्रतीकांच्या माध्यमाने निराकार परमेश्वराचे ध्यान सहजरीत्या होत असते

धर्म-अध्यात्माचा मूळ उद्देश हा मनुष्याच्या अंतरंगात मानवी अथवा दैवी गुणांची स्थापना करणे आहे. हे काम म्हणावे तितके सोपे नाही. मनुष्याची वैचारिक व भावनिक जडणघडण ही काही प्रमाणात अनुवंशिकरीत्या तर बऱ्याच प्रमाणात लहानपणापासून मिळणाऱ्या संस्कार व शिक्षणाने होत असते. संस्कार व शिक्षण म्हणजे काही ठराविक ज्ञान मुलांच्या मेंदूत भरणे नव्हे. जशा प्रकारचे वातावरण तो जास्तीतजास्त काळ अनुभवत असतो, त्याचेच अंकन त्याच्या अंतरंगावर संस्काराच्या रूपाने होत असते. जंगल बुक पुस्तकातील ‘मोगली’ हे मानवी पात्र याचे उत्तम उदाहरण आहे. ठराविक प्रकारच्या चिंतनाला एकाग्रपणे आपल्या अंतरंगात सामावून घेण्याचा सराव वारंवार केल्याने सुद्धा हळूहळू आमच्या चिंतन, चारित्र्य व वागणुकीत बदल घडून येत असतो. सत्संग, श्रेष्ठ साहित्याचे वाचन, ध्यानधारणा अशा प्रकारांना याकरिताच व्यक्तिमत्त्व निर्मितीमध्ये महत्त्वाचे मानले जाते.
प्रतीकपूजा व कर्मकांड सुद्धा याच उद्देशाची पूर्ती करतात. धार्मिक प्रतिके ही दिव्य गुणांचे व भावनांचे प्रतिनिधित्व करीत असतात. भारतीय संस्कृतीत प्रतीक व कर्मकांडाच्या माध्यमाने लोकप्रबोधनाची पद्धती विकसित करण्यात आली आहे. आमच्या पूर्वजांची ही मान्यता होती की मानवी मन हे प्रतिकांच्या भाषेला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते. भाव, कर्म व घटना यांना प्रतिकांचे रूप देऊन त्या माध्यमाने मानवी मनाला प्रशिक्षित करणे आणि भावप्रधान स्थितीत अचेतन मनाला संस्कारित करणे जास्त सोपे आहे, असे त्यांना वाटायचे. संपूर्ण जग हे चैतन्यमय आहे, ईश्वरीय शक्तीने भरलेले आहे आणि तेच निराकार प्राणतत्त्व हे जगातील अनेकानेक घटकांच्या रूपाने व्यक्त होत आहे, अशी आमच्या ऋषींची धारणा होती. म्हणून त्यांनी चराचर सृष्टीतील नदी,पर्वत, दगड, वनस्पती व प्राणीजगत अशा सर्वांमध्येच ईश्वरीय शक्तीची स्थापना केली. यांनाच परमेश्वराचे प्रतीक मानले व त्यांच्यापासून शिक्षण अथवा प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला. प्रतीकांच्या माध्यमाने निराकार परमेश्वराचे ध्यान सहजरीत्या होत असते. परमेश्वराच्या साकार व सगुण रूपावर मन एकाग्र झाल्यानंतर त्यावर संस्काराचे आरोपण करणे सुद्धा सहज शक्य आहे. शरीर शुद्धीसाठी ज्याप्रमाणे रोज स्नान केल्या जाते तसेच चित्तशुद्धीसाठी दिव्य गुणांचा समुच्चय असलेल्या सगुण व साकार परमेश्वराचे ध्यान रोज करावे लागते. विविध प्रतिक व कर्मकांड ही त्यात मदतच करीत असतात.
प्रतिकांचा उपयोग करताना तसेच कसलेही कर्मकांड करताना त्यात असलेला दिव्य भाव मनात उठणे, त्यावर चित्त एकाग्र करणे आवश्यक आहे. यात स्वत:च्या अस्तित्वाचे संपूर्ण विसर्जन, समर्पण परमेश्वर चरणी करून तो व मी दोघेही एकरूप झालेलो आहोत असे अनुभवणे आवश्यक असते. प्रतिकांची यांत्रिकतेने केलेली नुसती हालचाल व कोरडे भावशून्य कर्मकांड याने अंत:करणाला संस्कारित करणे शक्य होत नाही. ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे ईश्वरीय गुणांचे स्वत:च्या अंतरंगात अवतरीत होणे आहे. ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वरीय आदर्शाप्रति असलेला समर्पण भाव आहे. श्रद्धा म्हणजे त्याच्या श्रेष्ठतेप्रति असलेला असीम प्रेमभाव आहे. जेथे प्रेम असते तेथे त्या आदर्शांचे रक्षण करण्याचा, त्यासाठी मरण्याचा-मिटण्याचा निष्ठाभाव सुद्धा माणसात जागृत होतो. खऱ्या श्रद्धेने, भक्तीने नराचा नारायण होत असतो. हळूहळू स्वत:च ईश्वराचे प्रतिरूप झाल्याचा अनुभव त्याला होतो. तेव्हा त्याच्या मनोकामना स्वार्थसिद्धी पर्यंत मर्यादित न राहता विश्वब्रह्मांडरुपी साकार परमेश्वराच्या सेवेचा, ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ चा भाव त्यात येतो. हा ईश्वर-साक्षात्कार होण्यात त्याला सुरवातीला प्रतीक व कर्मकांड रुपी साधनांची गरज पडते. प्रतीक रुपी साधनांचे महत्त्व तर आहेच पण साधनांनाच साध्य मानून घेतले तर ईश्वरसिद्धी ( समग्र व्यक्तिमेत्त्वाची निर्मिती ) होत नाही. तेव्हा प्रतीक व कर्मकांडाचे प्रत्येक धमार्तील महत्व याच दृष्टीने बघायला हवे.

  • हेमंत बेंडे

गायत्री परिवार प्रचारक, मो. ९३७१४९३७०९.

Web Title: Purification of emotion: By rituals and symbols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.