Pre-Cultural Characteristics | पूर्वसंस्कारांमुळे बनतो स्वभाव
पूर्वसंस्कारांमुळे बनतो स्वभाव

प्रकृती म्हणजे स्वभाव. स्वभाव हा पूर्वसंस्कारामुळे असतो. अनेक जन्मांचा संसार, विषयसेवन त्यात, गुणदोष न पाहणे हा स्वभाव असा आहे, की तो जाता जात नाही. कारण म्हणच आहे, स्वभावाला औषध नाही. माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपला स्वभाव सोडत नाही. त्याची वृत्ती त्याकडेच धाव घेते. आपण ज्या संस्कारातून आलो, तसा त्याचा स्वभाव असतो. अनेक जन्मापासून तो संस्कार आहे.

समजा एखाद्याचा स्वभाव चांगला आहे. हे त्याच्या काही लक्षणावरून आपण जाणतो. एखाद्याची वृत्ती वाईट असेल, पशुप्रमाणे ती व्यक्ती वागत असेल तर आपण सहज म्हणतो, त्याचा स्वभावच तसा आहे. याकरिता पश्वादी वृत्तीचा त्याग करून स्वधर्माकडे आपली मनोभूमी लावावी. कारण स्वधर्म पाळला पाहिजे. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागले पाहिजे. येथे धर्म शब्दाचा अर्थही व्यापकदृष्टीने घेऊ हा धर्म - म्हणजे कर्तव्य. आपण आपल्या कर्तव्यापासून वंचित राहू नये. आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे. म्हणजे धर्म पाळणे होय.

स्वधर्माचरण हे काही प्रारब्धाचे स्थान नाही. उद्योगाचे आहे. ज्या बऱ्या-वाईट कर्माचे फल स्वर्ग-नरक आहे, असे आपण समजतो. माणसे काही प्रारब्धाला दोष देतात. अरे बाबा प्रारब्ध आपणच बनवतो ना? आपण शुभ-अशुभ, पाप-पुण्य या मार्गाने विचार करावा. आपल्या प्रयत्नाने पापही टळते व पुण्याचरणही करता येते. प्रारब्धावर विसंबून राहू नका. उदा. दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नव्हती; पण प्रयत्नाने पुत्रकामेष्ठी यज्ञ करून त्यांना संतान झाले. थोडक्यात म्हणजे कर्म चांगले करा. सर्व चांगले होईल. आपली अधोगती आपण करतो किंवा आपली आत्मन्नोती आपणच करतो. सर्व काही मनुष्याच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून चांगले कर्तव्य करा. म्हणजे कर्म चांगले होईल. ज्याला ज्याला जे जे सुख अथवा दु:ख प्राप्त होते, ते ते त्याच्या कर्माने त्याला प्राप्त होते. कोणाकडूनही कोणाला सुख अथवा दु:ख प्राप्त होत नाही. ते सर्व त्याच्या कर्मानुसार त्याला प्राप्त होते.


- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)


Web Title: Pre-Cultural Characteristics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.