परब्रह्मचिंतन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 01:05 AM2019-02-15T01:05:52+5:302019-02-15T01:06:14+5:30

- वामन देशपांडे मानवी योनीत शरीर आणि मानसिक पातळीवरच्या सुख दु:खाच्या तीव्र संवेदना सतत हेलकावे खात असतात. त्याचे महत्त्वाचे ...

Parabrahachinan | परब्रह्मचिंतन

परब्रह्मचिंतन

Next

- वामन देशपांडे

मानवी योनीत शरीर आणि मानसिक पातळीवरच्या सुख दु:खाच्या तीव्र संवेदना सतत हेलकावे खात असतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्याच्यासाठी हा मानवी जन्म मिळालेला आहे त्याचे भान बहुतांश माणसांचे सुटलेले असते. भगवंतांकडे आपले मन आणि बुद्धी केंद्रित करून, भोगलोलुप इंद्रियांना विषयवासनेपासून रोखण्याचा विवेकच त्यांच्यापाशी नसतो. भगवंताकडे आपले अवघे चित्त एकाग्र केंद्रित केले की, संसारबंधनातून मुक्तता मिळते. हे ज्ञान मिळविणे फक्त मानवी योनीलाच शक्य आहे. त्यासाठी तर भगवंतकृपेने हा दुर्मीळ मानवजन्म दिला आहे. परंतु ही ज्ञानजाणीव न जोपासल्यामुळे सर्वसाधारण माणूस करीत असलेल्या प्रापंचिक शृंखलेत अडकतो आणि सुखदु:खांना सतत सामोरे जातो. या मर्त्य सुखदु:खांना कवटाळून न बसता, स्वस्वरूपाला प्रथम जाणून घ्यावे. संकल्पांपासून निर्माण होणाऱ्या कामनांचा त्याग करावा आणि मनाला स्थिर करीत शरीरांतर्गत वासनाग्रस्त इंद्रियांच्या समूहाला, पूर्ण ताकदीने दूर करीत बुद्धीच्या साहाय्याने घट्ट रूतून बसलेल्या प्रापंचिक वृत्तीला हटवले तर चित्र परमात्मस्वरूपात निश्चित स्थिर होईल हा तत्त्वज्ञानभारला विचार भगवंतांनी अर्जुनाचे निमित्त करून संपूर्ण मानवी योनीला दिला. परमात्मा चराचरातून दाटून आहे ही सत्य जाणीव एकदा का झाली की साधक भक्ताच्या लक्षात येते की, या विश्वात फक्त परमात्मत्व सत्य आहे. बाकी सर्व भासमय असत्य आहे. तेच दु:खाचे मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवंत प्राप्तीचा मार्ग समजावून सांगताना, योगी पुरुष उपासनेचा मार्ग कसा नक्षत्रांकित करतात, यासंदर्भात म्हणतात की,
प्रशान्तमनसं हयेनं योगिनं सुखमुत्तमम।
उपैति शान्तरजसं ब्रहमभूतकमल्मषम ।।
पार्था, ज्या साधक भक्ताची पूर्वजन्माचीही पापे साधनेच्या बळावर नष्ट झालेली आहेत, ज्यांचा तमोगुण पूर्णांशाने भस्मिभूत होऊन, रजोगुणही पूर्णपणे शांत झालेला आहे, इतकेच नव्हे तर दोलायमन पूर्णपणे स्थिर आणि शांत झालेले आहे, अंत:करण निर्मळ झालेले आहे, अशा ब्रह्मस्वरूप झालेल्या योगी पुरुषाला नामामधले सात्त्विक सुख निश्चितपणे प्राप्त होते. याचा अर्थ असा की, एका परमेश्वराखेरीज, त्याच्या नामभारल्या अंत:करणात दुसरे कुठलेही विचार येतच नाहीत. मानवी जीवनातले हे सर्वोत्तम सात्त्विक सुख योगी पुरुष अष्टौप्रहर प्रत्यक्ष अनुभवत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, योगसंपन्न पुरुष मर्त्य सुखांनी चुकूनही बहरून येत नाही. कारण त्याने अतुट नामसाधनेच्या बळावर देहभावना पूर्णपणे विसर्जित केलेली असते. सर्वत्र परमेश्वर आहे या दृढभावनेने तो योगीपुरुष प्रत्येक क्षण नाम घेत वेचत असतो. सर्वोत्तम सुख हे आत्मसाक्षीने जगण्यात आहे, हे त्याच्या ज्ञानमयी बुद्धीने प्रत्येक क्षणी अनुभवलेले असते. त्यामुळे मानवी जीवाला बेजार करणाºया सुखदु:खाच्या लाटा त्याच्या आयुष्यात उसळतच नाहीत.
भगवंत अर्जुनाला पे्रमाने सांगतात की, ज्या योगी पुरुषाने आपले अवघे अस्तित्व परब्रह्मचिंतनात विलीन केलेले असते आणि म्हणूनच ब्रह्मानुभवाचे शाश्वत सुख त्याला सहजपणे लाभते. साधक भक्ताच्या साधनामय अशा भाग्यशाली आयुष्यातले हे सर्वोत्तम सुख असते. असा योगी पुरुष संपूर्ण विश्वात पसरलेल्या जीवसृष्टीमध्ये तेच आत्मतत्त्व अनुभवतो जो तो स्वस्वरूपात नित्य अनुभव असतो. याचा सोपा अर्थ असा की सर्व जीवांमध्ये सूक्ष्म रूपात तेच परमेश्वरी तत्त्व नांदते आहे याचा प्रत्यक्ष अनुभव योगी पुरुष नित्य घेत असतो.

Web Title: Parabrahachinan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.