मनाचे स्वरूप
By Admin | Updated: August 9, 2016 14:08 IST2016-08-09T14:08:44+5:302016-08-09T14:08:44+5:30
चोवीस तास व्यक्तीच्या सोबत असलेल्या मनाचे पूर्णत: आकलन अद्यापही कुणास झालेले नाही.

मनाचे स्वरूप
>- प्रा. डॉ. यशवंत पाटील
चोवीस तास व्यक्तीच्या सोबत असलेल्या मनाचे पूर्णत: आकलन अद्यापही कुणास झालेले नाही. मनाचे नेमके अचूक स्थान, आकार, रंग, रूप इ.बाबत निश्चित कुणासही सांगता आलेले नाही. पण मन शरीरात आहे. शरीराशिवाय मन आणि मनाशिवाय शरीर असे होत नाही. व्यक्तीचे ज्ञान, अनुभव, वय इ. मुळे मनाच्या समृद्धतेत कमी जास्त फरक असू शकतो. उदा. लहान बालकाचे मन निरागस असते. जस-जसे वय वाढते अनुभव, शिक्षण वा अन्य बाबींच्या कक्षा रुंदावतात तसे मनाचे आकलन बदलते. अशा या मनाला अचूक शब्दात पकडण्यात, त्याच्या स्वरूपाचे अचूक वर्णन करण्यात अनेक साहित्यिक, संत, मानसोपचार तज्ज्ञ मनावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ इ. पूर्णत: यश झालेले आहे.
खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी मनाबद्दल लिहितात, ‘मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात.’ यक्षाने युधिष्ठीराला सर्वात वेगवान काय? असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने सर्वात वेगवान माणसाचे मन असे उत्तर दिले. हिंदीतील कवी ‘दयाराम’ म्हणतो, ‘मन लोभी, मन लालची, मन लंपट, मन चोर रे । मन के मत न चलिये पलक-पलक पर मन और ।। शहंशाह हा उर्दू शायर मनाबाबत म्हणतो, ‘बालक मन और वानरा, कब हुं न रे निचंत । बालऔर वानर सोत है, मन सोवत।।’ म्हणजे बालकाचे मन आणि वानर कधीच गुप-चूप (स्थिर) बसत नाहीत. निदान बालक आणि वानर झोपी गेल्यावर तरी शांत होतात. पण मन झोपेतही उड्डाण करीत असते.
अशा या मनाचे भरण-पोषण किती केले जाते? मनाची समृद्धता, दृढता वाढविण्यासाठी काय केले जाते? वास्तविक कोणत्याही वयोगटातील जाती-धर्म, पंथ, लींग आदी भेदाभेद असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आचार-विचार आणि व्यवहाराचे नियंत्रक, कारक मन आहे. त्यांच्या स्वरुपाबद्दल सजग असणे केव्हाही चांगलेच.