मन सर्वात मोठा गुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 02:07 PM2019-12-07T14:07:20+5:302019-12-07T14:09:25+5:30

आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे

Mind is The Greatest Guru | मन सर्वात मोठा गुरू!

मन सर्वात मोठा गुरू!

Next

गुरू म्हणजे आध्यात्मिक, पारमार्थिक वाटेवरचाच असला पाहीजे असे अजिबात नाही. समजायला लागतं तेव्हापासून आई आपला प्रथम गुरू, नंतर शाळेतील शिक्षक आणि कालांतराने पुढे अनेक क्षेत्रातील मान्यवर आणि गुरूजंनांकडून आपण ज्ञान अर्जित करीत असतो. जीवनात संगीत, कला, क्रिडा, वैद्यकीय असो की व्यावसायिक क्षेत्रात गुरू हवाच. अपवादात्मक काही जण एकलव्यासारखे दुरून स्वकष्टावर विद्या आत्मसात करणारेही असतील. मात्र, तुम्ही कधी विचार केला का? आपला सर्वात मोठा गुरू कोण?
आपला सर्वात मोठा गुरू बाहेरील क्षेत्रातील दुसरा कुणी नसून आपल्याच शरीरात वास करणारे मन आहे. होय आपलं मन..आपलं मन! जसं सांगेल तसंच आपण वागत असतो.  कुठलाही निर्णय घेताना आधी मनाचाच कौल घेतो. मन सांगेल तसेच वागत असतो. म्हणजेच मन हे शक्तीस्वरूप आहे, याचीच जाणीव प्रत्येकाला होते. म्हणूनच मनाची शक्ती योग्य मार्गाला लावा. मनाची शक्ती योग्य मार्गाला वाली, आपल्या मनाला नियंत्रित करून आदर्श वागायला शिकविलं. तरच आपण गुणसंपन्न सत्शील असे होऊ शकतो!
मन हेच मनुष्याच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे. ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी मनाला योग्य वळण लावावेच लागेल. मनाला योग्य वळण लावण्यासाठी क्रोध, अहंकार सोडला पाहीजे. संज्जनांची संगत आणि वाणी गोड ठेवली पाहीजे.
समाजात बुध्दीमान माणसे खूप आहेत. पण आपल्या जाणतेपणाचा अहंकार नसलेली निगर्वी मनाची माणसे त्यात किती सापडतील, हा एक गहन प्रश्न आहे.
सदवस्तूचे ज्ञान घेताना त्या ज्ञानाचा अहंकार झाला तर ते ज्ञान आत्मसात होत नाही. ‘मी’ माझे म्हणणारे अहंकारी मन कुणाला आपलेसे करून त्याच्याशी समरस होऊ शकत नाही. ‘मनात एक  आणि ओठात एक’ या वृत्तीने मनुष्याचा ºहासच होतो. ‘क्रियेवीण नानापरी बोलीजे ते परी चीत दुश्चित ते लाजवीते’ याप्रमाणे माणूस खूप आदर्श वागण्याच्या बढाया मारतो, पण त्याप्रमाणे त्याचे आचरण नसते आणि जगाश्ी कितीही खोटे बोलले तरी स्वत:चे मनच त्याला आतून लाजवीत असते. म्हणूनच मनुष्याने मनाला शिस्त लावीत शुध्द आचरण ठेवावे.
माणसाच्या षड्रिपूपैकी सगळ्यात जास्त नुकसान करणारा विकार कोणता? तर तो क्रोध आहे.
 क्रोध कधीच एकटा येत नाही. तर संताप, मनस्ताप, द्वेष, निंदा या त्याच्या सगळ्या भावांना एकत्र घेऊन येतो. हे सारे येऊन गेलेत की त्यानंतर उरतो तो पश्चाताप! राग आवरायला, मन शांत, समाधानी ठेवायला काय हवे तर फक्त संतांची संगती असावी.
मना कोप आरोपणा ते नसावी,
मना बुधि हे सांधुसंगी वसावी!
मनानी कसं असावं, तर दयाळू, कृपाळू, मवाळू, स्नेहाळू असावं.
मनाला गुरूच नव्हे तर महागुरू केल्यास आपल्या जीवनाची नौका कुठेही भरकटणार नाही.


- शून्यानंद संस्कारभारती

Web Title: Mind is The Greatest Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.