महारुद्र अवतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:21 IST2019-01-05T00:21:36+5:302019-01-05T00:21:50+5:30
रामभक्तांना परमप्रिय असा हनुमान..! खरोखर हनुमंत म्हणजे एक चमत्कार..! त्याच्याबद्दल अभ्यास करताना, महारु द्र अवतार हा सूर्यवंशी.... या ओळीपाशी थबकले. रामदासरचित मारुती नमस्कारातील ही ओळ..!

महारुद्र अवतार
- शैलजा शेवडे
अखंड चिंतन रामकथेचे, असते निज अंतरी,
असेल का मग, अंजनीनंदन जवळी कोठेतरी?
रामघोष तो चाले जेथे, वायुरूपे जाई तेथे,
सूक्ष्मरूपाने वास करतो, रामभक्तां घरी।
भक्तांचा तो असे सारथी, रामहृदयानंद मारु ती,
उपासनेचा मार्ग दाखवी, अथांग करु णा उरी..।
रामभक्तीची सुंदर लाट, उचंबळोनी ये हृदयात,
रामदूत हनुमंतच हर्षे, नेईल पैलतीरी।
नितांतशरणागत हा भाव, रामभक्तीचा सुंदर गाव,
कैवारी हनुमान असे तर, शंका राही दुरी।
रामभक्तांना परमप्रिय असा हनुमान..! खरोखर हनुमंत म्हणजे एक चमत्कार..! त्याच्याबद्दल अभ्यास करताना, महारु द्र अवतार हा सूर्यवंशी.... या ओळीपाशी थबकले. रामदासरचित मारुती नमस्कारातील ही ओळ..! सूर्यवंशात शिवाचा अवतार म्हणजे मारुती. नव्याने प्रत्येक ओळीचा अर्थ लावतेय. अंजनीने शिवाची उपासना केली. शिवाने प्रसन्न होऊन सांगितले, घारीकडून तुला प्रसाद मिळेल, तो भक्षण कर. दशरथाने यज्ञ केल्यावर यज्ञपुरुषाने दशरथाला प्रसाद दिला, आणि तो तिन्ही राण्यांना द्यायला सांगितला. तेव्हा कैकेयीच्या हातातून एक घार येऊन प्रसाद घेऊन निघून गेली. आणि तो प्रसाद घारीने अंजनीच्या ओंजळीत टाकला. अंजनीने तो भक्षण केला; आणि तिच्या पोटी हनुमान.. मारुती जन्माला आला. मारुती हा महारुद्र समजला जातो... हनुमंताच्या उडीचे हे रामायणातील वर्णन बघा. धर्मपरायण सदाचारी हनुमान महेंद्र पर्वतावर चढला. शरीराचा विस्तार केला. विशाल उडीसाठी त्याने मानसिक तयारी केली. त्याच्या प्रचंड शरीराच्या वजनाने संपूर्ण पर्वत थरथरू लागला. मोठमोठे साप मुखातून आग ओकू लागले आणि खडकांना दंश करू लागले. हनुमान आपली शक्ती एकवटून दबा धरून बसला. पर्वतशिखराचे त्यामुळे तुकडे होऊ लागले, तसे प्रचंड दाबाने पाण्याचे प्रवाह उसळून बाहेर येऊ लागले. तिथे राहणाऱ्या साधूंसमवेत स्वर्गीय प्रदेशात विहार करणारी गंधर्व युगुले भीतीने त्वरित पर्वत सोडून पळून जाऊ लागली. हनुमानाने खोलवर श्वास घेतला आणि स्नायूंमध्ये सर्व शक्ती एकवटली. भगवान रामाच्या धनुष्यातून बाण सुटावा, अशा वेगाने हनुमानाने आकाशात उडी घेतली. उडीच्या वेगामुळे महेंद्र पर्वताच्या शिखरावरील सर्व वृक्ष उपटले जाऊन आकाशात भिरकावले गेले. हनुमानाच्या उड्डाणाच्या झंझावाताने महासागरात खळबळ माजली.