प्राण्या बोलावे बहू गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:06 IST2019-01-03T12:02:51+5:302019-01-03T12:06:50+5:30

मनुष्य हा प्राणी आहे असे म्हणतात, पण इतर प्राण्यांपेक्षा काही गोष्टी या मनुष्याला जास्त मिळालेल्या आहेत

Let's talk about animals | प्राण्या बोलावे बहू गोड

प्राण्या बोलावे बहू गोड

मनुष्य हा प्राणी आहे असे म्हणतात, पण इतर प्राण्यांपेक्षा काही गोष्टी या मनुष्याला जास्त मिळालेल्या आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन. ‘सामान्यमेत त्पशुभिर्नराणाम। धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीना: पशुभि: समाना: ॥, आहार, निद्रा, भय, मैथुन । सर्व योनीसी समसमान । परी मनुष्य देवीचे ज्ञान । अधिक जाण सर्वांसी ’ आहार , निद्रा , भय, मैथुन या चारही गोष्टी सर्व प्राण्यामध्ये समान आहेत. काहीही फरक नाही. पण मनुष्याला यापेक्षा वेगळे काहीतरी ईश्वराने दिले आहे. जे इतर प्राण्यांना मिळाले नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मनुष्याला ईश्वराने ‘वाणी’ दिली आहे. त्याला बोलता येते. या बोलण्याने मनुष्य एकमेकांशी सबंध प्रस्थापित करू शकतो. इतर प्राणीही आपापसात सबंध प्रस्थापित करू शकतात. पण मानवाइतके ते प्रगत नाहीत. कारण त्यांना मानवाएवढी समृद्ध, सक्षम वाचा नाही. पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये व अकरावे मन एवढ्या इंद्रियाद्वारे मानव आपली प्रगती करू शकला आहे. जागतिक समस्या फक्त चर्चेद्वारे सुटत असतात. त्यासाठीच युनो स्थापन केली आहे. चर्चा करायची म्हटले कि हा विषय वाणीचा आहे. म्हणजे तुम्हाला चांगले बोलता आले पाहिजे. ज्याला चांगले बोलता येते तो मनुष्य लोकप्रिय होतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, ‘मुखी अमृताची वाणी । देह देवाचे करणी ।।’ किंवा ‘बोलू ऐसे बोल । जेणे बोले विठ्ठल डोले’, ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।’ चांगले बोलणे फार आवश्यक आहे. समोरच्याला तुमच्या बोलण्याने आनंद व्हायला पाहिजे. वार्मस्पर्शी बोलण्याने अनर्थ घडून येतात. अहो ! फक्त बोलण्याने महाभारत घडले आहे. द्रौपदी दुर्योधनाला उद्देशून म्हणाली होती, आंधळ्याचे पोरे सुद्धा आंधळेच आहेत. एवढ्याच बोलण्याचा राग आला आणि पुढील महाभारत घडले. रामायणात सुद्धा सीतामाई लक्ष्मणाला म्हणाल्या होत्या कि, ‘श्रीरामाने तुम्हाला हाका मारून सुद्धा तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी जात नाहीत. ते संकटात आहेत असे असून सुद्धा तुम्ही जात नाहीत. कारण तुमची माझ्याबद्दलची वासना वाईट आहे.’ याच बोलण्याने वैराग्यशील लक्ष्मण सुद्धा त्यांच्यापासून दूर निघून गेला. आणि त्यानंतरच सीतामाईंचे अपहरण झाले व पुढील रामायण घडले. किंबहुना आपण आज पाहतो कि राजकारणात लोक एकमेकांवर चिखलफेक करतात व मने दुखावतात. संपूर्ण देशाचा कारभार फक्त बोलण्यावर चालतो. कारण भाषण स्वतंत्र असल्यामुळे सर्व प्रकारचे बोलणे हे लोक बोलतात व राज्यकारभार पाहतात. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी बोलण्याचे एकूण बारा दोष सांगितले आहेत. ‘विरोधवाद बळू । प्रणिताप ढाळू ।उपाहासूं छळू ।वर्मस्पर्शू ।। आटू कटू वेगु विंदाणु ।आशा शंका प्रतारणू । हे सन्यासिले अवगुणु । जिया वाचा ।।’ विरोधात बोलणे, भांडणास उत्तेजन देणे, दुस-यास ताप देणारे बोलणे, उपहासाने बोलणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोंबणारे बोलणे, हट्टाने बोलणे, आवेशाने बोलणे, कपटाने बोलणे, आशा लावणे, संशयात पडणारे बोलणे, फसवेगिरीचे बोलणे हे दोष टाळलेच पाहिजेत. माउली म्हणतात, ‘साच आणि मावळ । मीतले आणि रसाळ । शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ।। सत्य बोलावे पण ते रसाळ व प्रिय असावे कटू नसावे. एका सुभाषितांमध्ये म्हटले आहे, सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम । प्रियं च नानृतम ब्रूयात , एष धर्म: सनातन: ॥ सत्य बोलावे पण प्रिय सत्य बोलावे अप्रिय सत्य बोलण्याचे टाळावे आणि खोटे तर कधीच बोलू नये. प्रिय आहे पण असत्य आहे असेही बोलणे बोलू नका.
एकदा काशीमध्ये श्री संत तुलसीदास महाराज गंगेच्या काठावर बसले होते आणि तेवढ्यात एक कसाई धावत धावत आला व त्याने श्री तुलसीदास महाराजांना विचारले, महाराज! इकडून एखादी गाय गेलेली तुम्ही बघितली काहो ? महाराजांच्या समोरून ती गाय गेलीच होती व त्यांनी बघितली सुद्धा होती पण जर खरे सांगावे तर गोहत्येचे पातक लागेल व खोटे कसे बोलावे ? हे धर्मसंकट त्यांच्या पुढे उभे राहिले तेव्हा महाराज म्हणाले, ‘अरे ! ज्याने बघितली त्याला सांगता येत नाही आणि ज्याला सांगता येते त्याने बघितली नाही, त्यामुळे मी काय सांगणार ? म्हणजे डोळ्यांनी बघितली पण डोळ्याला वाचा नाही आणि वाणीला बोलता येते पण तिने बघितले नाही. हे शिताफीने बोलणे मोठे सुंदर रीतीने महाराजांनी सांगितले.
’अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत । स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते’ भागवद्गीतेमध्ये हेच सांगितले आहे कि जेणेकरून उद्वेग उत्त्पन्न होईल असे न बोलणे सत्य व प्रिय बोलावे हे महत्वाचे. संत सुद्धा ‘सहज बोलणे हित उपदेश । करुनि सायास शिकविती’ ‘तुका बोले वाणी । तेथे वेदांत वाहे पाणी ।। ’ महाराजांचे बोलणे असे होते कि ते सहज जरी बोलले तरी हिताचेच बोलत होते व ते बोलायला लागले तरी त्यांच्या बोलण्यातून वेदांत स्रवत असतो. म्हणून चांगले बोलण्यासाठी माणसाने कंजूसी करू नये. ‘प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तव:। तस्मात तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता ।। चांगल्या बोलण्याने कोणीही प्रसन्न होतो म्हणून चांगले बोलणे टाळू नये त्यासाठी दारिर्द्य काय कामाचे ?
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत श्री अमृतराय यांचे एक पद फार सुंदर आहे, ‘प्राण्या बोलावे बहू गोड ।धृ ।। दुष्ट दुरूक्ती दुर्वचनाची । टाकून द्यावी खोड ।।१।। आंतर बहिर नाबदि साखर । सेवी सुखाची कोड ।।२।। अमृत म्हणे नरदेहा येवोनि ।संतसमागम जोड ।।३।। अमृतरायांनी अगदी सोप्या भाषेत माणसाने कसे बोलावे हे सांगितले. दृष्ट, दुरूक्ती व दुर्वचन कधीही बोलू नये आणि मित्रांनो प्रत्येक माणसाला जर एवढे बोलण्याचे ताळतंत्र जमले तर जगात वैरभाव राहणार नाही जगात शांती नांदेल.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी (पाटील)ता. नगर
मोबाईल ९४२२२२०६०३

Web Title: Let's talk about animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.