कर्मयोग कर्मसंन्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:15 IST2018-08-02T04:15:07+5:302018-08-02T04:15:17+5:30
कर्म आणि ते घडविणारा कर्ता यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग म्हणजे क्रियाशून्य किंवा कर्मरहित, कर्मत्यागी होय. दुसरा वर्ग म्हणजे कर्ता होय. तिसरा वर्ग कर्मयोगी; तर चौथा ‘कर्मसंन्यासी' होय.

कर्मयोग कर्मसंन्यास
- डॉ. रामचंद्र देखणे
कर्म आणि ते घडविणारा कर्ता यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग म्हणजे क्रियाशून्य किंवा कर्मरहित, कर्मत्यागी होय. दुसरा वर्ग म्हणजे कर्ता होय. तिसरा वर्ग कर्मयोगी; तर चौथा ‘कर्मसंन्यासी' होय. व्यवहारात अशी माणसे आढळतात की, जी अद्वितीय कर्मे सोडाच, पण नित्याचे जीवन जगताना आपल्या वाट्याला आलेली विहित कर्मेही करीत नाहीत; पण कर्माच्या फळाची मात्र अपेक्षा धरतात. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी त्यांची भूमिका असते.
जीवनामध्ये जर कर्म पेरले तरच समृद्धीची फळे येतील. कर्म तर करायचे नाही आणि कर्मफळाची अपेक्षा तर धरायची- हा जो वर्ग आहे, तोच कर्मत्यागी किंवा क्रियाशून्य वर्ग होय. वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीची कोणतीही अपेक्षा अशा वर्गाकडून करणे चुकीचे ठरते, दुसरा वर्ग हा निष्ठेने कर्मही करतो आणि कर्माच्या फळाची आशाही धरतो. कर्तृत्वाचा- म्हणजे 'हे कार्य मी केले आहे' या भावनेचा त्याला अहंकारही असतो. याच वर्गाला 'कर्ता' म्हणतात. व्यवहारातील अनेक कर्मे अशा वर्गाकडून घडली जातात. तिसरा वर्ग म्हणजे 'कर्मयोगी' होय. तो नित्यकर्म करतो; परंतु कर्मफलाची आशा करीत नाही, तो निष्काम कर्मयोगी होय. इथे कर्माचे सातत्य असते; पण कर्मफलाची आशा नसते. तर चौथा वर्ग म्हणजे 'कर्मसंन्यासी', जो नित्य कर्मात रमतो, फळाची आशाही करीत नाही आणि या कर्माचा मीच कर्ता आहे; ही कर्तृत्वाची भावना म्हणजेच कर्तृत्वाचा अहंकारही मावळलेला असतो. नित्य-कर्म करूनही फलाशेमध्ये आणि कर्मबंधात न अडकणारा - तोच कर्मसंन्यासी होय. । ‘संन्यास: कर्मयोगश्च’
या गीतेच्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात - अर्जुना, सखोल विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मोक्षदायकच आहेत. परंतु त्यातही कर्मयोग हा अधिक सोपा व सुलभ आहे. माऊली दृष्टांत देतात,
‘‘तरी जाणां नेणा सकळां ।
हा कर्मयोगु कीर प्रांजळा।
जैसी नांव स्त्रिया-बाळा ।
तोयतरणी ।।’’ ज्ञाने. ५११६
पाण्यातून तरून जायचे आहे. ज्याला पोहता येते तो सहजपणे पैलतीरावर जाईल. पण ज्यांना पोहता येत नाही अशा स्त्रिया आणि बालकांना नावेचा आधार घेऊनच पैलतीरावर जावे लागते. त्याप्रमाणे कर्मयोग हा सर्वांना तरून जाण्याचे नावेसारखे, सोपे साधन आहे.