सद्गुरू जग्गी वासुदेवआपण जर स्वत:ला प्रेरित केले किंवा इतरांकडून प्रेरणा घेतली, तर आपल्याला निराश करणारी कोणीतरी व्यक्तीसुद्धा असू शकते. जर एखाद्या गोष्टीने आपल्याला उत्साह येत असेल, तर एखाद्या गोष्टीमुळे नैराश्यसुद्धा येऊ शकते. प्रेरणा म्हणजे तुम्ही एक खोट्या आत्मविश्वासाचा आधार घेत असता. ज्या ठिकाणी आवश्यक स्पष्टता नसते, तेथेच आत्मविश्वासाची गरज भासते. जेथे स्पष्टता आहे, तेथे तुम्हाला आत्मविश्वासाची गरज पडत नाही. मी जर तुम्हाला एखाद्या चांगल्या उजेड असलेल्या ठिकाणी चालायला सांगितले, तर तुम्हाला आत्मविश्वासाची गरज भासणार नाही, परंतु मी तुम्हाला जर एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी चालायला सांगितले, तर अचानकपणे लोकांना आत्मविश्वासाची गरज निर्माण होईल, कारण तेथे स्पष्टता नाही. दुर्दैवाने आत्मविश्वास हा स्पष्टतेला पर्याय आहे, यावर लोकांचा विश्वास बसत चाललेला आहे, परंतु तसे नाहीये, स्पष्टतेला कोणताच पर्याय नाही. जीवनात आपण जर स्पष्टता आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, जर आपण खोट्या आत्मविश्वासाच्या जोरावर जीवन जगू लागलो, तर कोणीतरी नक्कीच त्याला टाचणी लावून तो फोडून टाकील. असे समजा की, तुम्ही कामाच्या ठिकाणी होतात आणि कोणीतरी तुम्हाला म्हणाले की, तुम्ही या पृथ्वीवरील सर्वात अद्भुत व्यक्ती आहात. मग तुमचा आनंद गगनात मावेनासा होतो. मग तुम्ही घरी आलात आणि घरच्यांनी तुम्ही खरोखर कोण आहात, हे तुम्हाला सांगितले की तुम्ही परत जमिनीवर येता! प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये स्पष्टता आणण्यासाठी प्रयत्न करत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. परिस्थितींमुळे, लोकांमुळे किंवा स्पर्ध्येच्या शेवटी आपल्याला मिळणारा अपेक्षित लाभ, अशा आत्मविश्वासाच्या आधारावर पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तर हा प्रेरित आत्मविश्वास नेहमीच घटणारा आहे. हा स्पष्टतेसाठीचा पर्याय नाही. जीवनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्पष्टता हाच एकमेव मार्ग आहे.
आनंद तरंग: प्रेरित राहण्याचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 02:55 IST