कल्पनाशक्ती... प्रतिकूल परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी दिलेली देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:43 IST2017-09-26T03:43:42+5:302017-09-26T03:43:52+5:30
शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की ईश्वराने विश्व निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली व विश्व अस्तित्वात आले. म्हणजेच ईश्वराच्या इच्छेनुसार भौतिक सृष्टीची निर्मिती झाली.

कल्पनाशक्ती... प्रतिकूल परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी दिलेली देणगी
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय
शास्त्रात असे वर्णन पाहायला मिळते की ईश्वराने विश्व निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली व विश्व अस्तित्वात आले. म्हणजेच ईश्वराच्या इच्छेनुसार भौतिक सृष्टीची निर्मिती झाली. मानवसुध्दा ईश्वराची संतान आहे. म्हणूनच मानवामध्येसुध्दा ही क्षमता दिसून येते. मानव आपल्या चिंतन शक्तीने आपले विश्व निर्माण करतो.
भारतीय तत्त्वज्ञानात या विषयावर खूप सखोल चिंतन झालेले आहे. असे म्हणतात की जसे आपले विचार तसेच विश्व निर्माण होईल. आधुनिक मनोविज्ञान सुध्दा या गोष्टीचे समर्थन करते. यामुळेच तत्त्वज्ञान व मनोविज्ञानाने सकारात्मक विचारांवर भर दिलेला आहे. जेव्हा आपण देवी-देवतांच्या स्तोत्रांचे विवेचन करतो, त्यावेळी असे लक्षात येते की ही स्तोत्रे सकारात्मक व शुध्द विचारांनी ओतप्रोत आहेत. जेव्हा आपण मन लावून या स्तोत्राचे पठण करतो तेव्हा आपल्या मनात जी ध्वनी-ऊर्जा निर्माण होते, ती सुध्दा शुध्द व सकारात्मक असते. त्या शुध्द व सकारात्मक विचारांपासून जे विश्व निर्माण होते, ते सुध्दा सकारात्मकच असते.
आज या आधुनिक युगात मानव अत्यंत तणावग्रस्त झालेला आपण पाहतो. दैनंदिन गरजांची पूर्तता करणे आज त्याला कठीण झाले आहे. स्पर्धात्मक जीवनाच्या ओझ्याने तर त्याची कंबरच मोडलेली आहे आणि म्हणूनच मानवाचे जीवन अत्यंत नकारात्मक व नैराश्यपूर्ण होत आहे.
आजच्या चिकित्साशास्त्राच्या म्हणण्यानुसार आजचा मानव हा मानसिक रोगांनी चांगलाच त्रस्त झालेला आहे. चिकित्साशास्त्राच्या म्हणण्यानुसार मानवाला होणारे ८०% पेक्षा जास्त रोग हे मनामुळे निर्माण होतात.
या प्रतिकूल परिस्थितीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी निसर्गाने मानवाला एक अनमोल अशी देणगी दिलेली आहे. ती देणगी म्हणजेच- ‘कल्पनाशक्ती’.
आपण या कल्पनाशक्तीमुळे आपल्या विश्वात बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी एक साधी पध्दत आहे, ज्याचा उपयोग करून मानव आपल्या जीवनात चमत्कारिकरीत्या बदल घडवू शकतो. शांत ठिकाणी स्थिर बसून लांब व खोलवर दहावेळा श्वास घ्या, पाच मिनिटानंतर शरीर व मन शिथिल झाल्यानंतर कल्पना करा की मी स्वस्थ आहे, माझे जीवन समृध्द आहे, मी सुखी आणि श्रीमंत आहे. कल्पनाशक्तीमुळे निर्माण झालेले हे विचार आकर्षणाच्या सिध्दांतामुळे अशा प्रकारच्या सकारात्मक तरंगांना निर्माण करतात, जे रहस्यमयरीत्या भौतिक जीवनात त्याचप्रकारे सकारात्मक बदल घडवून आणतात.