उकिरड्यावर तुळशीचे रोप उगवले तर, ती तुळस अपवित्र होते का..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:22 IST2019-08-23T13:18:21+5:302019-08-23T13:22:59+5:30
असे जर नसेल तर मग कोणी जातीवरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कसे ठरवता येईल. .?

उकिरड्यावर तुळशीचे रोप उगवले तर, ती तुळस अपवित्र होते का..?
- हभप भरतबुवा रामदासी (बीड)
संतांचा भागवत धर्म हा समता, बंधुता, व एकता या मानवी जीवन मूल्यांचे जतन करणारा होता. समतेच्या तीरावर ममतेचे मंदिर उभारून पंढरीच्या वाळवंटात त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा गोपाळकाला केला. सर्व सामान्य माणसाच्या अंत:करणात त्यांनी समतेचे बीजारोपण करून विषमतेची विषवल्ली समूळ नष्ट केली. माणूस हा जातीने श्रेष्ठ ठरत नाही. तर तो कर्माने श्रेष्ठ ठरतो. म्हणून कर्म चांगले करावे. संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात :--
कुश्चल भुमीवरी जन्मली तुळस
अपवित्र तियेसी म्हणू नये!!
काक विष्ठे माजी जन्मला पिंपळ
अमंगल तयासी म्हणू नये!!
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी
उपमा जातीची देऊ नये.
घाणेरड्या उकिरड्यावर तुळशीचे रोप उगवले तर, ती तुळस अपवित्र होते का. .? कावळ्याने विष्ठा केलेल्या जागेवर जर, पिंपळ उगवला तर त्याला अमंगल म्हणावे का. .? असे जर नसेल तर मग जातीवरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कसे ठरवता येईल. .? वास्तवात जगात सर्व श्रेष्ठ माणूसच आहे. पण आज माणसानेच माणसाला किती हीन पातळीवर आणले आहे. कवीवर्य सुरेश भट म्हणतात :--
पुसतात जात हे मुडदे मसनात एकमेकांना !
कोणीच विचारीत नाही, माणूस कोणता मेला!!
कवी बहिणाबाई चौधरी म्हणतात,
असा कसा रे माणूस कडू लिंबाचा रे पाला! वेल काकडीचा होता, बार कारल्याचा आला!!
संतांनी माणसाला माणूस बनविण्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजविला. सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून एकात्मतेचा लोकजागर केला. एकात्मता कशी असावी, या बद्दल शांती सागर एकनाथ महाराज म्हणतात,
उजवे हातीचा पदार्थ डावे हाती देता ! तेथे कोण देता घेता तैसा एकात्मता सर्वांभूती!!
विहीरीवर पाणी भरणारे पुष्कळ असतील पण विहीर तर एकच आहे ना. ...प्रत्येकाचे भांडे वेगळे असेल पण भांड्यातले पाणी तर एकच आहे ना...? तसे प्रत्येकाचे शरीर भिन्न असेल पण आत्मतत्त्व तर एकच आहे ना. ....!
कबीर बाबाजी म्हणाले, कबीर कुॅआ एक है पनिहारी अनेक! बर्तन सबके न्यारे है, पानी सबमे एक!!
संतांनी आकांत रवाने सांगितले, बाबांनो, आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरे आहोत. कुणाचाही द्वेष, मत्सर, वैरभाव, करू नका. एकनाथ महाराज म्हणतात,
दु:ख नेदावे कोणाला, उच्च नीच जरी झाला ! अंतरात्मा ओळखिला तोची जाणा सज्जन!!
गाडगेबाबा म्हणजे समाज वादाचे मोठे व्यासपीठ होते. बाबा म्हणत, भारतात जिकडे तिकडे देवळे दिसतात पण माणूस मात्र सापडत नाही. माय बाप हो, देवाने सर्वांनाच दोन डोळे दिले. मग सर्वथैव समदृष्टी ठेवण माणसाचे कर्तव्य नाही का. .?
माणूस चालत्या बोलत्या दिसणाऱ्या जिवंत माणसावर प्रेम करू शकत नसेल तर मग तो न दिसणाऱ्या देवावर कसा प्रेम करू शकेल. ..? आधी माणसावर प्रेम करा. मग देवावर प्रेम करा. किंबहुना माणसातच देव बघा. .
माऊली म्हणतात,
जें जें भेटे भूत, तें तें मानिजे भगवंत!
हा भक्ती योग निश्चित जाण माझा!! संताचा भागवत धर्म हाच आहे.
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्यांच्या भ्रमणध्वनी 8329878467 )