याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:56 AM2019-08-09T03:56:34+5:302019-08-09T03:59:11+5:30

अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा?

human activities causing disasters | याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची?

याला विकासाची वाट म्हणावी की विनाशाची?

Next

- विजयराज बोधनकर

एकदा एका गावात वेगळ्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावयाचा होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गावात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे होते. परंतु अडचण अशी निर्माण झाली की गावात झाडे लावण्यासाठी जमीनच शिल्लक नव्हती. विकासाच्या नावावर मातीच्या देहावर सिमेंटचे पक्के झाकण लावून तिला मुकी-बहिरी, आंधळी केली होती. शेकडो वर्षांपासून आपला मातीशी ऋणानुबंध आहे. मातीत खेळत अनेक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्यात. पावसाळा व हिवाळ्यात गावातल्या रस्त्याच्या दुतर्फा गवत आणि अन्य वनस्पती उगविण्याचे आता पूर्णपणे बंद झाले आहे. थंडावा देणारी मातीची घरे पाडून तिथे निर्जीव सिमेंटची टोलेजंग घरे गावातही उभी राहू लागली आहेत.

खरेतर, माती आणि माता या दोन्ही जन्मदात्या; पण या दोघींनाही ग्रहण लागले. मातेची मम्मी झाली आणि मातीला सिमेंटची जेल झाली. शहरात तर माती अंगावरच्या तिळाइतकी शिल्लक आहे. निसर्गाच्या मूलभूत घटकांचीच मानवाला अडचण होऊ लागली. आपल्या संस्कृतीत पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, हवा आणि अवकाश हे केंद्रस्थानी आहे. पावसाचे पाणी मातीत मुरले जाऊन विहिरीच्या झऱ्यातून शुद्धीकरण होऊन पिण्याच्या कामी यायचे. मातीत मुरलेल्या पाण्यामुळे शेती व आजूबाजूचे शिवार हिरवेगार राहून उत्तम प्राणवायूचा पुरवठा होत राहायचा. डोंगरदऱ्यांत पडलेले पावसाचे पाणी सतत नदी-नाल्यांतून वाहत राहायचे. आज मानवी स्वार्थापायी डोंगरच्या डोंगर उद्ध्वस्त होताना दिसताहेत, तिथे पाऊस तरी कसा कोसळणार? त्याचमुळे पृथ्वीवरच्या उष्णतेने उच्चांक गाठला आहे. बारमाही थंड असलेली गावे आता आग ओकू लागली आहेत. अतिवेगाने प्रवास करण्याच्या वेडापायी सर्वत्र सिमेंटचेच रस्ते विनाशासाठी सज्ज आहेत. याला विकास म्हणावा की हट्टीपणा?

Web Title: human activities causing disasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.