Happiness wave - Charitheyan ornamentation | आनंद तरंग - चारित्र्यच अलंकार
आनंद तरंग - चारित्र्यच अलंकार

प्रा. शिवाजीराव भुकेले

भागवत धर्माचे सोज्वळ कळस म्हणून गौरव होणाऱ्या संतश्रेष्ठ तुकोबांच्या चारित्र्यबलाबद्दल एक सुंदर कथा सांगितली जाते. कथेचा सारांश असा आहे, तुकोबांचा तपोभंग करण्यासाठी बंबाजी गोसावी, सालोमालो इ. मंडळींनी एका नर्तकीला सुपारी दिली. तिने भंडारा डोंगरावर जाऊन असे नृत्य करायचे की, तुकोबा पांडुरंगाचे भजन सोडून त्या नर्तकीच्या भजनी लागले पाहिजेत. नर्तकीने सुपारी स्वीकारली व भररात्री तुकोबांच्या समोर नृत्य करू लागली, नेत्र कटाक्ष टाकू लागली; पण श्रीरंगाच्या रंगात रंगलेल्या तुकोबांनी नर्तकीकडे नेत्र उघडून पाहिलेच नाही. शेवटी बिचारी नर्तकी नाचूनऽऽ घायाळ झाली. सकाळ होताच तुकोबांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा नर्तकी म्हणाली, तुकोबा माझे नृत्य जाऊ द्या; पण सांगा ना मी कशी दिसते? तेव्हा देहू गावचे हे चारित्र्याचे लोक विद्यापीठ उद्गारले -


परावीया नारी रखुमाई समान ।
हे गेलें नेमोन ठायींचेंची ॥
जाय वों तू माते न करी सायास ।
आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥

सदर घटना नक्की कशी व केव्हा घडली या बाबतीत विद्वानांच्या मध्ये कदाचित वादही असतील; पण तुकोबांच्या निष्कलंक चारित्र्यबलाबद्दल मात्र कुठलाच वाद नाही. तुकोबांचे कुटुंब अलंकारांनी सजले नव्हते, तर शुद्ध चारित्र्य हाच त्यांचा खरा अलंकार होता. म्हणूनच तर ते भागवत धर्माचे कळस झाले. जर ज्ञानाची इमारत चारित्र्याच्या पायावर उभी असेल, तर साºया विश्वात मातृ-पितृ व भगिनी भाव निर्माण करता येतो; पण ज्ञानाच्या इमारतीला चारित्र्यभ्रष्टतेचे ग्रहण लागले, तर शेकडो आसाराम निर्माण होतात अन् तुकोबा देवळापुरते मर्यादित होतात. चारित्र्यहीन माणसे कितीही उच्च स्थानावर बसली तरी त्या स्थानालाच ती भ्रष्ट करून रिकामी होतात. कावळा उच्च शिखरावर बसला तरी त्याला गरुडाची सर येत नाही. उलट शिखरालाच तो घाण करून रिकामा होतो. याउलट सत्याची अन् चारित्र्याची काट्या-कुट्यांनी भरलेली वाट तुडविणारे माणसातील गरुड फारच कमी असतात. वस्तुत: त्यांचीच समाजाला खरी गरज आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. साºया आयुष्याच्या इमारतीला तडा गेला तरी चालेल, पण चारित्र्यास तडा जाता कामा नये, ही भावना सर्वात महत्त्वाची. भोवतालची परिस्थिती पाहिली, की वाटते या चारित्र्यसंपन्नतेसाठी जाणीवपूर्वक साधना करणारे तुकोबा, ज्ञानोबा, शिवबा, विवेकानंद जरी आज नव्याने जन्माला आले नाहीत तरी चालतील; पण चारित्र्याचा लिलाव करून समाजातील सद्भावनेचा दिवाच मालवून टाकणारे समाजकंटक समाजात निर्माण होता कामा नयेत. ती वृत्ती वाढू देता कामा नये. कारण हेच नराधम समाजाचे आणि राष्ट्राचे अध:पतन करण्यास कारणीभूत होतात. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्यावी की, आपण ज्या स्थानावर बसलोय ते स्थान किती उच्च आहे, यापेक्षा आपले चारित्र्य किती उच्च आहे., हे खूप गरजेचे आहे. चारित्र्यसंपन्न माणसाकडे एकही अलंकार नसतो; पण त्याचे निर्मल चारित्र्य हाच त्याचा सर्वश्रेष्ठ अलंकार असतो. त्याच आधारावर त्याचे समाजात मूल्यमापन होत असते. समाजातील अशा दीपस्तंभाविषयी तुकोबांनी म्हटलेच होते -

बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाउले ।
अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन ।
त्याचा होर्ईन किंकर । उभा ठाकेन जोडुनी कर ।
तुका म्हणे तोची देव । त्याचे चरणी माझा भाव ।
 


Web Title: Happiness wave - Charitheyan ornamentation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.