Happiness and misery are the side of the coin! | सुख-दुःख एकाच नाण्याच्या बाजू!

सुख-दुःख एकाच नाण्याच्या बाजू!

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही येत असतात. या जगात अशी कोणी व्यक्ती नाही जिला सुखाची इच्छा नाही वा सुखाची कामना नाही. प्रत्येकाला केवळ सुखच हवे असते. दु:ख कुणालाच नको असतं. परंतु या कलियुगात अनेक लोक असे आहेत जे नेहमी दु:खी, अशांत व परेशान असतात. ते नेहमी स्वत:च्या दु:खाचे कारण इतरांवर थोपवितात. जर अमुक एक व्यक्ती माज्या जीवनात आली नसती तर मी खूप सुखी राहिलो असतो. त्या व्यक्तीमुळेच माज्या जीवनात अशी विपरीत परिस्थिती आली. अशा अनेक विचारांमुळे ज्या व्यक्तीपासून त्याला दु:खाचा आभास होतो त्याच्याविषयी मनात सदैव द्वेष, घृणा, वैर-विरोधाची भावना बाळगतो. त्याचबरोबर अशा दु:खद परिस्थतींना विसरण्यासाठी मनुष्य दारु, विडी, सिगारेट, मादक पदार्थांचे सेवन यांच्या आहारी जाऊन, आपले जीवन आणखीनच नर्कमय बनवित असतो.  अनेक जण ईश्वरालाही दोष देतात. निराशेमुळे मनुष्य नैतिक मुल्य, सकारात्मक चिंतन, सत्यता, इमानदारी या सर्व गोष्टींपासून दूर जाऊ लागतो. परिणामत: दिन प्रतिदिन त्याच्या हातून अधिकच पापकर्म घडू लागते.
एका अध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रसंगी एक दारुड्या मला भेटण्यासाठी आला. त्याने मला विचारले की भाईसाहेब, मला दारु सोडायची आहे. त्यासाठी मी काय करू ? त्यावर मी विचारले की तू दारु का पितोस? तो म्हणाला मला एका व्यक्तीने धोका दिला. त्यामुळे मला रात्रभर झोप येत नव्हती. सारखा तोच विचार पुन्हा पुन्हा येत असे. कधी-कधी त्या माणसाचा खूप राग येऊ लागला हेता. माझी ही मन:स्थिती माझ्या मित्राला सांगितली तेव्हा त्याने मला दारु प्यायला सांगितले. तेव्हापासून मी दारु प्यायला सुरुवात केली. त्यावर मी त्याला  विचारले, मग आता का सोडतोस ? तेव्हा तो म्हणाला, 'भाईसाहेब, आता खूप त्रास होतो. माझी किडनीसुद्धा खराब होऊ लागली आहे. डॉक्टरांनी सुद्धा दारु सोडायला सांगितले आहे. पण माझ्याकडून मात्र सुटत नाही. आता मी काय करू?'
त्यानंतर मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला की जेव्हा तू दारु प्यायला सुरुवात केलीस तेव्हा तूला ती कशी वाटली? तेव्हा तो म्हणाला की मला खुपच कडवट लागली. त्यावर मी त्याला सांगितले की तूला जीवनात धोका देणारी गोष्टसुद्धा कडवट होती व दारुसुद्धा कडवट होती. मग जर तू धोका देणारी गोष्ट मनातल्या मनात पिऊन टाकली असती तर तला दारु पिण्याची गरजच वाटली नसती. परंतु वर्तमान समयी जीवनात येणाºया कडवट गोष्टींना पिण्याची अर्थात सहन करण्याची शक्ती मनुष्यात नाही. त्यामुळे आजचा मनुष्य जीवनात दु:खी व अशांत आहे. 
केत्येकांना आपल्या जीवनातील हे दु:ख पर्वताएवढे वाटते. त्यातून मुक्त होण्यासाठी अनेकजण जीवघात सुद्धा करतात. अशी अनेक उदाहरणे आपण रोज वर्तमान पत्रातून वाचत असतो. कित्येक जण जेव्हा दु:ख सहन करू शकत नाहीत.  जर त्याच्या जीवनात ही शक्ती आली तर तो मानसिक, शारीरिक व सामाजिक दृष्ट्या सुखी होऊ शकेल.  आपण सहज राजयोगाचा नियमित अभ्यास केला तर जीवनात येणाºया कोणत्याही विपरीत परिस्थितींना आपण सहज तोंड देऊ शकतो. राजयोगाद्वारे आपल्यात सहनशक्ती, सामावून घेण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, निर्णय शक्ती या सर्व शक्ती येतात. त्यामुळे प्रत्येकाने राजयोगाचा अभ्यास अवश्य करावा. वास्तविक तसं पाहिलं तर आपल्या जीवनात घडणाºया ज्या काही सकारात्मक किंवा नकारात्मक घटना आहेत त्या आपल्याच पूर्व जन्मांच्या कर्माची फळे आहेत. जेव्हा आपण हे विसरून जातो तेव्हा आपण इतरांना त्यासाठी दोषी मानतो. टाळी कधी एका हाताने वाजत नसते. सध्या जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर असे समजायला हरकत नाही की आपण ही कोणत्या ना कोणत्या जन्मात त्या व्यक्तीला असा त्रास दिला होता. त्याचा तो हिशोब आता धेत आहे. सदैव लक्षात ठेवा की आपले जे नातेवाईक आहेत. शेजारी आहेत, मित्रमंडळी आहेत, आॅफीसमधील सहकर्मचारी आहेत. अलौकिक परिवार आहे. त्यातील कोणी आपल्याला देण्यासाठी आले आहे तर कोणी घेण्यासाठी आले आहेत. देणे किंवा घेणे हेच जीवन आहे. आपण जर एखाद्या बरोबर चांगला व्यवहार केला असेल तर तो देखील आपले चांगलेच करणार आणि वाईट व्यवहार केला असेल तर तो देखील वाईटच व्यवहार करणार. कर्माच्या ह्या गुह्य गतिला जो नीटपणे समजतो तोच सुखी होतो. याउलट जो कर्माच्या गुह्य गतिला विसरतो तो दु:खी होतो. तात्पर्य म्हणजे आपल्याच कर्माच्या पेरलेल्या बीजामुळे सुख वा दु:ख मिळत असते. सदैव लक्षात ठेवा आपल्या जीवनातील दु:खासाठी कोणी दुसरी व्यक्ती कारणीभूत नसून आपलीच चुकीची कर्मे आहेत. त्यामुळे या दुनियेत लोकांना किंवा विपरीत परीस्थितीला घाबरु नका परंतु जर काय घाबरायचेच असेल तर चुकीच्या कमार्चे बीज टाकण्यासाठी घाबरा. मनात जरी वाईट अथवा चुकीचा संकल्प आला तरी त्या चुकीच्या कमार्ला प्रत्यक्षात आणू नका. कारण जर का एकदा चुकीचे बीज पेरले गेले तर त्याचे फळ कधी ना कधी भोगावे लागणारच. संसार एक कर्मक्षेत्र आहे. काही लोकांना वाटते की येथे अन्याय होत आहे. परंतु लक्षात ठेवा या सृष्टीवर कोणतेही युग असो, येथे अन्याय कधीच होत नाही. काहीजण म्हणतात, हा मनुष्य इतका भ्रष्टाचारी आहे तरी सुद्धा किती संपत्तीवान, धनवान आहे.
परमेश्वर अशा मनुष्यावर का मेहरबान आहे. दिवसेंदिवस त्याची प्रगतीच हात चालली आहे. वास्तविक हे त्याच्या मागील जन्मात केलेल्या श्रेष्ठ कर्मान फळ आहे. आज तो जे चुकीचे कार्य करीत आहे. त्याचेही फळ त्याला लवकरच मिळेल. म्हणूनच म्हटले जाते, भगवान के घर देर है, मगर अंधेर नहीं। एकदा का चुकीचे कर्म केले की त्यात परमेश्वरसुद्धा काही बदल करत नाही. परंतु काही कमार्ची फळे याच जन्मात मिळतात तर काही कर्माची फळं मिळण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. जेव्हा आपण ह्या कर्माच्या गुह्यगतिला समजतो तेव्हा आपण सकारात्मक बनून, प्राप्त परिस्थितीवर सहज मात करू शकतो व आपली जीवनरुपी नौका सहज पार करू शकतो. 

- मीना चंदन
दहिगाव ता. तेल्हारा

Web Title: Happiness and misery are the side of the coin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.